विधिमंडळात ओढावला लाजिरवाणा अनु'वाद' ! मुख्यमंत्र्यांची माफी; तर महसूलमंत्र्यांची दिलगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:14 AM2018-02-27T03:14:26+5:302018-02-27T03:47:40+5:30
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी झालेल्या मराठी अनुवादाच्या गोंधळाबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माफी मागितली. विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी झालेल्या मराठी अनुवादाच्या गोंधळाबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माफी मागितली. विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.
‘आज जे काही घडले अत्यंत गंभीर, निषेधार्हच आहे. त्यासाठी मी सरकारच्या वतीने माफी मागतो’, असे मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले. तत्पूर्वी, अनुवादाच्या घोळाचे तीव्र पडसाद दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनु‘वाद’ उपस्थित केला. ही घटना गंभीर आहे. तिची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की हा सभागृहाचा अपमान आहे. अनुवादक नसल्याने अनुवादाचे काम शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्याबद्दल ज्येष्ठ सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी आक्षेप घेतला. अनुवादासाठी तावडेंनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली होती का. एका मंत्र्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर केलेले हे अतिक्रमण आहे, असे ते म्हणाले.मात्र, तावडे यांनी काहीही चूक केलेले नसल्याचे प्रमाणपत्र अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादाची व्यवस्था नसणे ही अत्यंत गंभीर, निषेधार्ह बाब आहे. हा विषय अध्यक्ष व सभापतींच्या अखत्यारित येतो पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना आज संध्याकाळपर्यंत घरी पाठवा, अशी तीव्र भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यावर, योग्य ती कारवाई संध्याकाळपर्यंत केली जाईल,असे अध्यक्ष बागडे यांनी सांगितले. तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यपालांचे अभिभाषण सदस्यांना मराठीतून मिळू नये यासाठीच घोळ घालत गेला. हा राज्यातील जनतेचा अपमान आहे. अभिभाषण सुरू असताना एक मंत्री उठून अनुवादाचे काम हाती घेतात हा राज्यपालांचा अपमान आहे. काँग्रेसचे शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी चौकशी व कारवाईचे निर्देश दिले.
राज्यपालांची नाराजी -
राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना तातडीने पत्र पाठवून, त्यांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवाद वाचनाची व्यवस्था न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बाबीची अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच चुकीसाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी आणि काय कारवाई केली ते मला कळवावे, असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी, आजचा प्रकार हा मराठी भाषेचा खून असल्याची टीका करताच, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. तुम्ही बोलताय तो मराठी भाषेचा खून आहे. एवढ्या प्रकाराने मराठीचा खून होतो का, असा सवाल त्यांनी केला. मुनगंटीवारांना मध्यंतरी गळ्याचा त्रास झाला होता. त्यांना बोलण्यापासून तुम्ही रोखायला हवे, असे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणताच, सभागृहात हशा पिकला.
सरकारचा निषेध असो!
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभच वादळी झाला. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवादक नसल्यामुळे इंग्रजीतून भाषण ऐकावे लागले. सरकारने मराठी भाषेचा खून केल्याचा आरोप करत, विरोधकांनी अभिभाषणावर बहिष्कार टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली.