सरकारी धोरणामुळेच ‘नीट’चा गोंधळ
By admin | Published: May 16, 2016 01:01 AM2016-05-16T01:01:53+5:302016-05-16T01:01:53+5:30
महापालिका निवडणुकीत पुण्यातील सुजाण जनता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देईल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पाषाण : रखडलेली पुणे मेट्रो, विमानतळ प्रकल्प, ‘नीट’मधून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारला आलेले अपयश, दुष्काळाबाबत सरकारची असंवेदनशीलता, पुण्यात पाच लाखांत घर देण्याची फसवी योजना, मेक इन इंडियाच्या नावाखाली चालवलेली जनतेची फसवणूक, एकीकडे सरकारवर टीका करायची आणि गुळाच्या ढेपेला चिकटून बसल्यासारखे सत्तेत राहून फायदे घ्यायचे, असे शिवसेनेचे दुटप्पी धोरण, दुष्काळापासून लक्ष वळविण्यासाठी उचललेला वेगळ्या विदर्भ व मराठवाड्याचा मुद्दा आदी प्रकारांमुळे सरकारचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचे जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुण्यातील सुजाण जनता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देईल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १० पाषाण-सुतारवाडी येथील राजमाता क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन, लॉन टेनिस ग्राउंड व जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महापौर प्रशांत जगताप, आमदार जयदेव गायकवाड, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, बापू पठारे, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, रंजना मुरकुटे, अश्विनी कदम, बंडू केमसे, प्रमोद निम्हण आदी या वेळी उपस्थित होते.