निलंगेकरांच्या चौकशीवरून गोंधळ
By Admin | Published: July 29, 2016 03:39 AM2016-07-29T03:39:14+5:302016-07-29T03:39:14+5:30
कर्जाच्या फसवणूक एका प्रकरणात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी
मुंबई : कर्जाच्या फसवणूक एका प्रकरणात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी विरोधकांनी गुरुवारी विधानसभेत जोरदार हंगामा केला. कॉँग्रेस व राष्ट्रावादीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, परिणामी कामकाज दोनवेळा तहकुब करावे लागले.
विरोधक आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील कोणीही मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला तर त्यांना पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही देऊन या विषयावरील गोंधळास पूर्णविराम दिला.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी या विषयाला हात घातला. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे या आयुधाचा वापर करीत विखे पाटील यांनी संभाजी पाटील यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे काही पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. विखेपाटील विस्ताराने हे प्रकरण सांगत माझ्याकडे काही नवीन पुरावे असल्याचे असताना गिरीष बापट यांनी त्यास आक्षेप घेतला. मागच्या आठवड्यात या विषयावर चर्चा झाली असल्याने नेमके मुद्दे मांडावेत, अशी सूचना केली. एवढेच नाही तर त्याच त्या विषयावर बोलणार असाल तर ते आम्ही आम्ही ऐकून घेणार नाही, असे बापट म्हणताच वादाची ठिणगी पडली. जयंत पाटील यांनी संसदीय कार्य मंत्र्यांना ही भाषा शोभत नाही, अशा शब्दांत बापट यांना सुनावले, त्याचवेळी सभागृहात गोंधळ सुरु झाला. विरोधक वेलमध्ये आले, घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे अध्यक्षांनी पहिल्यांदा पंधरा मिनिटासाठी सभागृह तहकूब केले.
पुन्हा कामकाज सुरु झाले तेव्हाही ‘भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या’ अशा घोषणा देत, सभागृहातील गोंधळ सुरुच ठेवला. त्यामुळे पुन्हा दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब ठेवले गेले. पुन्हा कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री सभागृहात आले. तालिका अध्यक्षांनी विखेपाटीलांना बोलण्यास परवानगी दिली. (प्रतिनिधी)
कमिशनर इन्क्वायरी अॅक्टखाली चौकशी करावी
- व्हिक्टोरिया फुड प्रोसेसिंग लि. या कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या फसवणूक प्रकरणात निलंगेकर यांचे नाव आहे. बॅँकेला एक जमीन बदलून दुसरीच मिळकत दिली आहे. या प्रकरणी सरकारने कमिशनर इन्क्वायरी अॅक्टखाली चौकशी करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
- कोणाच्याही मनात शंका राहू नये म्हणून यासंबंधातील कागदपत्रांची तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, एवढेच नाही तर भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात मंत्र्यांचे नाव आल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.