‘सासर-माहेर’वरून संभ्रम : मतदान यंत्रावर नाव बदलले; महिला उमेदवार हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 04:06 PM2017-02-17T16:06:49+5:302017-02-17T19:22:22+5:30
निवडणूकीची रणधुमाळी अंतीम टप्प्यात पोहचली आहे.
नाशिक / आॅनलाईन लोकमत : नाशिक : निवडणूकीची रणधुमाळी अंतीम टप्प्यात पोहचली आहे. मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना प्रभाग क्रमांक १५मधील एका अपक्ष उमेदवाराला धडकी भरली आहे. कारण त्या महिला उमेदवाराला निवडणूक आयोगाने ज्या नावाने ‘निशाणी’ दिली त्या नावातच मतदान यंत्रावर बदल झाला आहे. त्यामुळे या उमेदवाराच्या प्रचारावर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक १५ ब सर्वसाधारण महिला गटातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या परदेशी सिमा भास्कर यांच्या मतदान यंत्रावर परदेशी सिमा राजेंद्र असा उल्लेख असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर परदेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा के ला. यावेळी त्या म्हणाल्या, निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कार्डावरील उमेदवाराचे नाव व अर्जावरील नावात फरक असल्यामुळे सदर अर्ज स्विकारला नाही. मतदान कार्डावर जे नाव आहे त्याच नावाने अर्ज भरावा लागेल असे सांगितले. त्यानंतर परदेशी यांनी नावात दुरूस्ती करुन कार्डावरील नावाप्रमाणे परदेशी सिमा भास्कर असा नामोल्लेख करत उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. ८ फेबु्रवारी रोजी उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात आली तेव्हा देखील परदेशी यांना ज्या नावाने दुरूस्ती करुन अर्ज भरून दिला त्याच नावाने ‘गॅस सिलिंडर’ ही निशाणी देण्यात आली होती. यामुळे त्यांनी प्रचारामध्येदेखील त्याच नावाने प्रचार केला; मात्र मतदान अवघ्या तीन दिवसांवर आले असताना अचानकपणे या प्रभागातील १५ बच्या मतदान यंत्रावर परदेशी यांचे नाव जुन्या पध्दतीनेच छापून आल्याने त्यांना धडकी भरली आहे.