संभ्रमावस्थेतच पार पडली एमएचटी-सीईटी परीक्षा
By admin | Published: May 6, 2016 02:30 AM2016-05-06T02:30:53+5:302016-05-06T02:30:53+5:30
अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) गुरूवारी राज्यभरात सुरळीत पार पडली.
मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) गुरूवारी राज्यभरात सुरळीत पार पडली. सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’ परीक्षेचे प्रकरण प्रलंबित असल्याने सीईटी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसून येत होता.
नीट परीक्षेबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या फेरयाचिकेवरील सुनावणी गुरुवारीही पुर्ण होऊ शकली नाही. सकाळी सीईटीची धाकधूक आणि दुपारी नीटचा निकाल या संभ्रमावस्थेतच सीईटीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी पालकांसह परीक्षा केंद्रावर पोहचले होते. त्यातील बहुतेक पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे मत नयना दाने या पालकाने व्यक्त केली. मंत्री विद्यार्थ्यांना खुल्या मनाने परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करत आहेत. मात्र विद्यार्थी म्हणजे मशिन नसून सीईटी रद्द होण्याची भीती मुलांसह पालकांच्या मनात असल्याची त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
भौतिकशास्त्राने रडवले
दरवर्षीप्रमाणे यंदाही भौतिकशास्त्र पेपर कठीण गेल्याची प्रतिक्रिया बहुतेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे नेमके पेपरमध्ये काय लिहावे, हेच सुचले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
काही विद्यार्थ्यांनी तर अवघड गेलेल्या भौतिकशास्त्रामुळे गणिताचा पेपर देण्याचा विचारच रद्द केला होता. मात्र निकालावर नापास येईल, या भीतीने संपूर्ण परीक्षा दिल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात रिक्षा पकडण्यासाठी गोंधळ
सकाळी रिक्षांची कमतरता आणि सीईटीच्या परीक्षेसाठी वेळेत जाण्यासाठी उतावीळ झालेले विद्यार्थी यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात विद्यार्थ्यांचा
एकच गोंधळ उडाला. परीक्षेला वेळेत पोहोचावे म्हणून हजारो विद्यार्थी गुरूवारी रिक्षा पकडण्यासाठी सैरभैर धावत होते. यंदा ठाणे जिल्हयामध्ये २५ हजार ३८९ विद्यार्थी आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्र मासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेला बसले होते.
गुरूवारी सकाळी ११.३० ही पेपरची वेळ होती. या परीक्षेला जाण्यासाठी सकाळी ८ वा. या विद्यार्थ्यांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डवर गर्दी केली होती. उशीरा पोहोचल्यास परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी भीती त्यांना होती.
एकीकडे चाकरमान्यांची असलेली गर्दी आणि दुसरीकडे परीक्षेसाठी आलेले हजारो विद्यार्थी यामुळे ठाणे स्टेशन परिसरात गोंधळच गोंधळ सुरू होता. जांभळी नाक्याच्या दिशेने स्टेशनकडे येणाऱ्या रिक्षा रस्त्यावरील खोदकामामुळे वाहतूककोंडीत अडकल्याने स्टँडपर्यंत येईपर्यंत त्यांना वेळ लागत होता. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांचा गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला. सकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता.
११,५०८ विद्यार्थ्यांची दांडी
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १ हजार ५४ परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेस एकूण ४ लाख ९ हजार २६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षेला ३ लाख ९७ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर २.८ टक्के म्हणजेच ११ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याची माहिती परीक्षा कक्षाने दिली.
मुंबई शहरातून परीक्षेसाठी एकूण २५ हजार २४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील केवळ २३ हजार ३९४ विद्यार्थी परीक्षेला हजर होत. मुंबई उपनगरातून २० हजार ९८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २० हजार ५५८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.