पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गोंधळ
By Admin | Published: May 18, 2016 05:33 AM2016-05-18T05:33:56+5:302016-05-18T05:33:56+5:30
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत प्रश्नपत्रिकेतील घोळ संशयास्पद ठरला.
नागपूर : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत प्रश्नपत्रिकेतील घोळ संशयास्पद ठरला. परिणामी, परीक्षार्थ्यांनी ‘सेटिंग’चा आरोप करून जोरदार हरकत घेतली. त्यामुळे पोलीस मुख्यालयात प्रचंड गोंधळ उडाला. नारेबाजी, रस्तारोकोमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्तांनी संतप्त परीक्षार्थ्यांना आपल्या कक्षात बोलवून त्यांची समजूत काढल्यानंतर तब्बल चार तासांनी तणाव निवळला. पोलीस भरतीच्या मैदानी आणि इतर प्रक्रियेत यश मिळवलेल्या तीन हजार पात्र परीक्षार्थ्यांना आज सकाळी लेखी परीक्षेसाठी पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले होते. त्यानुसार, राज्याच्या कानाकोपऱ्यातून पात्र परीक्षार्थी लेखी परीक्षेला हजर झाले. सकाळी ७नंतर लेखी परीक्षा सुरू झाली. ए, बी, सी, डी अशा चार स्वरूपात प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. उत्तरासाठी चार पर्याय दिले होते. १० वाजता दरम्यान पेपर संपवून हळूहळू विद्यार्थी मुख्यालयाच्या मैदानात जमू लागले. प्रश्नपत्रिकेच्या बी संचात उत्तराचे जे चार पर्याय दिले होते त्यातील एक पर्याय काहीसा फिक्कट (पुसटसा) असल्याचे परीक्षार्थ्यांच्या लक्षात आले. पुसट असलेले सर्वच पर्याय योग्य उत्तर होते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वकच हा प्रकार केल्याचा विद्यार्थ्यांना संशय आला. त्याअनुषंगाने सेटिंगची चर्चा वाढली अन् गोंधळ झाला.(प्रतिनिधी)