सांगोल्यात चक्क स्मशानभूमीत होणार विवाह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 02:56 PM2019-07-18T14:56:58+5:302019-07-18T14:59:10+5:30
उद्या अक्षता सोहळा; मंडप उभारणीचे काम सुरू, तयारी अंतिम टप्प्यात
अरुण लिगाडे
सांगोला : स्मशानभूमी म्हटलं की, कोणीही घाबरल्याशिवाय राहणार नाही हे वास्तव आहे, परंतु जर एखादा विवाह सोहळा स्मशानभूमीत होत असेल तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको. असाच एक विवाह सोहळा १९ रोजी सकाळी १०़४५ च्या मुहूर्तावर सांगोल्यातील स्मशानभूमीत होत आहे.
मूळचे आंध्रप्रदेश (जलालपूर, निजामाबाद) येथील व बीडचे रहिवासी लक्ष्मण राजाराम घनसरवाड हे कुटुंब २०१७ साली सांगोल्यात आले. नगरपालिकेने त्यांना मसनजोगी म्हणून नियुक्त केले. गेल्या अडीच वर्षांपासून लक्ष्मण घनसरवाड यांचे कुटुंबीय स्मशानभूमीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबाचा दैनंदिन जीवनचरित्र स्मशानभूमीतच चालतो. लक्ष्मण घनसरवाड हे जरी मसनजोगीचे काम करीत असले तरी त्यांचा मुलगा सुदर्शन १२ वी तर हर्षदीप ७ वीत आहे़ मुलगी पूजा हिने डी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अनुराधा बी.एस्सीचे व जयश्री १० वीचे शिक्षण घेत आहे.
दरम्यान, लक्ष्मण घनसरवाड यांची मोठी मुलगी पूजा हिचा विवाह मनाठा (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील सुभाष गोविंद सागवाने यांचा मुलगा संतोष (बी. फार्मसी) याच्यासमवेत जुळून त्यांचा १३ मे रोजी बीडमध्ये साखरपुडा झाला होता; मात्र विवाह सोहळ्याची तारीख निश्चित झाली नव्हती. लक्ष्मण घनसरवाड व सुभाष सागवाने यांनी १० दिवसांपूर्वी विवाह सोहळ्याचे नियोजन करुन १९ जुलै रोजी विवाह करण्याचे नियोजन केले. लक्ष्मण घनसरवाड यांनी मामाच्या मुलाला मुलगी दिल्यामुळे या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबासह पै-पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्टांची १०० वºहाडींचीच उपस्थिती राहणार आहे; मात्र लक्ष्मण घनसरवाड यांनी शहरातील मान्यवरांना पत्रिका देण्याचे टाळून हा घरगुती विवाह सोहळा करण्याचे नियोजन केले आहे.
मंडप उभारणीचे काम सुरु
- विवाह सोहळ्यासाठी वाढेगाव रोडवरील स्मशानभूमीतच ३० बाय ४० चा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे़ विवाह सोहळ्यासाठी येणाºया वºहाडी मंडळींना शिरा, भात, भाजी, चपाती असा जेवणाचा मेनू ठेवला आहे. विवाह सोहळ्यात वधू-वर पक्षाकडून रितीरिवाजाप्रमाणे मानपान होणार आहे़ या विवाहाचा होणारा खर्च वधू-वर पक्षाच्या पित्याकडून निम्मा निम्मा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ शुक्रवारी हळदी असल्याने मुलीच्या हातावर मेहंदी काढण्यात आली आहे़ शिवाय त्याच दिवशी हळदीचा कार्यक्रम होईल़ या निमित्ताने पाहुणे रेल्वेने येणार असल्याचे सांगण्यात आले.