मोदींवर टीका करताना उद्धवनी केले काँग्रेसचे कौतुक
By admin | Published: February 10, 2017 06:37 AM2017-02-10T06:37:21+5:302017-02-10T08:49:33+5:30
मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य करण्याच्या नादात काँग्रेसचे गुणगान केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असूनही दररोज मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य करण्याच्या नादात काँग्रेसचे गुणगान केले आहे. देशाची प्रगती मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मागच्या दोन वर्षात झालेली नाही.
आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच; पण असे अनेक ‘सुखराम’ नंतर भाजपच्या गंगेत पावन करून घेतले गेलेच ना ? असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
काँग्रेसने चोऱ्यामाऱ्या करूनच राज्य कारभार केला हे मान्य केले तरी ज्या देशात स्वातंत्र्याच्या वेळी सुईदेखील बनत नव्हती तो देश आज आर्थिक व औद्योगिक बाबतीत खूपच पुढे गेला आहे असे अग्रलेखात लिहीले आहे. २८० खासदारांचे बहुमत असलेल्या भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत देशात नक्की कोणते परिवर्तन घडवून आणले? असा सवाल त्यांनी विचारला.
इंदिरा गांधी यांनी हिंदुस्थानची फाळणी घडवणाऱ्या पाकिस्तानला त्यांनी १९७१ च्या युद्धात धडा शिकवला. इंदिरा गांधींनी नोटाबंदी करून गरीबांचे कंबरडे मोडले नाही, पण पाकिस्तानचे कंबरडे जरूर मोडले. इंदिरा गांधींचा कणखर बाणा म्हणजे देशाची कवचकुंडलेच होती अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात काँग्रेसचे कौतुक करण्यात आले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- नोटाबंदीमुळे आर्थिक अराजक माजूनही पंतप्रधान मोदी ते मान्य करायला तयार नाहीत. मोदी यांची व्यक्तिगत प्रचारयंत्रणा जोरकस आहे. त्यामुळे देशाला खड्डय़ात घालणाऱ्या अनेक योजना व धोरणे त्यांची प्रचारयंत्रणा रेटून नेत आहे. ‘नोटाबंदी’ किंवा आर्थिक घोटाळ्यांबाबत काँग्रेसला ठोकण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. मोदी यांनी या नकारात्मक भूमिकेतून बाहेर पडले पाहिजे. काँग्रेसने चोऱ्यामाऱ्या करूनच राज्य कारभार केला हे मान्य केले तरी ज्या देशात स्वातंत्र्याच्या वेळी सुईदेखील बनत नव्हती तो देश आज आर्थिक व औद्योगिक बाबतीत खूपच पुढे गेला आहे. देशाची आजची प्रगती ही फक्त मागच्या दोनेक वर्षांत होऊ शकत नाही. आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच; पण असे अनेक ‘सुखराम’ नंतर भाजपच्या गंगेत पावन करून घेतले गेलेच ना? सत्तेची पेज देईल त्याची ‘शेज’ गरम करण्याचे धोरण हासुद्धा भ्रष्टाचारच आहे व रेनकोट घालून आंघोळ केली तरी त्यामुळे अंग भिजल्याशिवाय राहत नाही.
- काँग्रेस व इतर सत्तालोलुप पक्षांनी गेल्या ५० वर्षांत फक्त खा खा खाल्ले असे कुणी सांगत असतील तर त्यावर क्षणभर विश्वास ठेवला पाहिजे. त्यातही मोदी म्हणजे देशाचे पंतप्रधान जेव्हा असे सांगतात तेव्हा तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे हे सगळय़ांचे कर्तव्यच ठरते. कारण जे विश्वास ठेवणार नाहीत ते उद्या देशद्रोही ठरवून मारले जाऊ शकतात, हे आता लक्षात घेतले पाहिजे. खरा प्रश्नअसा आहे की, २८० खासदारांचे बहुमत असलेल्या भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत देशात नक्की कोणते परिवर्तन घडवून आणले? इंदिरा गांधी यांनी वांछु समितीचा नोटाबंदीचा अहवाल मानला नाही. हा राजकीय धोक्याचा निर्णय असून काँठोसला निवडणुका लढवायच्या नाहीत का, असा उलटा सवाल त्यांनी यशवंतराव चव्हाणांना त्यावेळी केला होता असे सांगण्यात येते. हे खरे आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी त्यामुळे मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीचे समर्थन होत नाही. इंदिरा गांधी यांना काहीच कळत नव्हते, त्यांनी देशाची बजबजपुरी केली हेसुद्धा मान्य करू, पण हिंदुस्थानची फाळणी घडवणाऱ्या पाकिस्तानला त्यांनी १९७१ च्या युद्धात धडा शिकवला.
- पाकिस्तानात फौजा घुसवल्या. पाकिस्तानचे सरळ दोन तुकडे करून सूड घेतला. हे काम धाडसाचे आणि ऐतिहासिक होते. पाकिस्तान किंवा देशद्रोह्यांच्या बाबतीत त्यांनी दुतोंडी भूमिका घेतली नव्हती. इंदिरा गांधींनी नोटाबंदी करून गरीबांचे कंबरडे मोडले नाही, पण पाकिस्तानचे कंबरडे जरूर मोडले आणि या कार्याबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील इंदिराजींचा ‘दुर्गा’ अशा शब्दांत गौरव केला होता. आज पाकिस्तान जरा जास्तच शेफारला आहे व सीमेवर आमच्या सैनिकांची बलिदाने होत आहेत. इंदिरा गांधी यांनी नोटाबंदीचा प्रस्ताव झिडकारला. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, पण त्यांचा कणखर बाणा म्हणजे देशाची कवचकुंडलेच होती. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. संस्थानिकांचे तनखे बंद करून देशाची आर्थिक घडी बसवली. देशाच्या मुळावर येणाऱया खलिस्तानी चळवळीचा कायमचा बीमोड करण्यासाठी शेवटी सुवर्णमंदिरात रणगाडे घुसवून भिंद्रनवालेचा खात्मा केला. लंडन येथे कश्मिरी अतिरेक्यांनी रवींद्र म्हात्रे या आपल्या उच्चायुक्ताची हत्या करताच पुढच्या २४ तासांत इंदिरा गांधी यांनी कश्मिरी अतिरेक्यांचा नेता मकबूल भट यास फासावर लटकवून दहशतवादापुढे झुकणार नसल्याचा संदेश जगाला दिला.
- इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. राजीव गांधींच्या बाबतीतही मतभेद असू शकतात, पण त्यांनी स्वच्छ कारभार देण्याची जिद्द ठेवली होती. बोफोर्सचे गालबोट त्यांना लागले, पण देशात संगणक युग आणण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. दूरसंचार आणि दळणवळणाच्या बाबतीत देशाने आज केलेल्या प्रगतीचा पाया राजीव गांधी यांनीच घातला व नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक अराजकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी केला. हे सर्व मागच्या ६० वर्षांत या मंडळींनी केले नसते तर मोदी यांच्या हाती सोमालिया, बुरुंडीप्रमाणे देशाची मूठभर राखच पडली असती. श्री. मोदी यांच्या धडपडीचे आम्ही स्वागत करतो. मात्र ‘नोटाबंदी’च्या प्रवचनातून बाहेर पडून अयोध्येत राममंदिर बांधता येईल काय? व पाकिस्तानात रणगाडे घुसवून दाऊदसारख्यांचा बंदोबस्त करता येईल काय? यावर त्यांचे मत जाणून घ्यायला देशाला जास्त आवडेल