मराठा आरक्षण रेटण्यासाठी हार्दिक पटेलला सांगलीचं आमंत्रण
By admin | Published: September 1, 2015 06:36 PM2015-09-01T18:36:16+5:302015-09-01T18:36:16+5:30
हार्दिक पटेलच्या यशामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आशा पल्लवित झाल्या असून मराठा सेवा संघानं हार्दिकला सांगलीतल्या सभेत उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ९ - हार्दिक पटेलच्या यशामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आशा पल्लवित झाल्या असून मराठा सेवा संघानं हार्दिकला सांगलीतल्या सभेत उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे. मराठा सेवा संघाच्या नेत्यांनी याबाबत सांगितले की हार्दिक पटेलच्या आंदोलनाशी आम्ही सहमत असून त्याची मागणी आम्हाला मान्य असल्याचे संघाच्या पदाधिका-यांनी सांगितले.
हार्दिक पटेलने आपलं आंदोलन देशव्यापी करण्याचं सुतोवाच करताना जाट, गुज्जर व मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीशी नाळ जोडली होती. तोच धागा पकडत मराठा सेवा संघाच्या पदाधिका-यांनीही मराठ्यांचा समावेश अन्य मागासवर्गीयांमध्ये व्हावा ही मागणी नव्याने रेटली आहे. न्यायालयाने राज्यामध्ये ३२ टक्के असलेल्या व सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेले नसलेल्या या समाजाला आरक्षण देणे अवैध ठरवले होते. त्यामुळे आता न्यायालयीन मार्ग बंद झाल्याने मराठा सेवा संघ हार्दिक पटेलच्या मार्गाने जाण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे.
अर्थात, मराठा आरक्षणाच्या मागणीला महाराष्ट्रात तितका प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही जितका अवघ्या दोन महिन्यात हार्दिक पटेलने पटेलांच्या मागणीला मिळवला. त्यामुळे हार्दिकची मराठा आरक्षणाला मिळू शकणारी साथ काय परिणाम घडवेल याची उत्सुकता आहे.