विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भारतीय सैनिकांचे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:33 AM2019-02-27T05:33:54+5:302019-02-27T05:34:06+5:30
एकमताने ठराव मंजूर; देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना चोख उत्तर द्या
मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी पहाटे पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आला.
दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव केला. आम्हाला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे. भारतावर वाईट नजर टाकणाऱ्यांना अशाच पद्धतीने चोख उत्तर दिले पाहिजे, अशा शब्दांत सत्ताधारी व विरोधकांनी भूमिका मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत भारतीय सैन्य आणि हवाई दलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले ही अभिमानाची बाब आहे. भारत कमजोर देश नाही. जगातील मजबूत सैन्य आणि इतर देशांपैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, नसीम खान आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमची छाती ५६ इंचांची झाली
एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी शिवसेनाही कौतुकात मागे नव्हती. शिवसेनेचे सुभाष साबणे म्हणाले की, जवान आमचा आत्मा असून आज आमची छाती ५६ इंचांची झाली. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देशातील जवानांना सॅल्युट करताना पाकिस्तानवालो होश मे आओ, नाहीतर जगाच्या नकाशावरून गायब व्हाल, असा संताप व्यक्त केला. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनीही भारतीय सैनिकांचे अभिनंदन केले.