‘ईडी’चे अभिनंदन, आता इकडेही लक्ष द्या..! एकनाथ शिंदे, फडणवीसांना पत्र...
By अतुल कुलकर्णी | Published: December 11, 2022 06:49 AM2022-12-11T06:49:39+5:302022-12-11T06:49:58+5:30
अजित पवार यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा आराखडा तयार केला होता, पण पैसा कसा उभारावा या विवंचनेत तो कागदावरच राहिला.
- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय देवेंद्र फडणवीसजी,
नमस्कार!
आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. नागपूर ते मुंबई असा महामार्ग असला पाहिजे, असंं स्वप्न आपण आठ- नऊ वर्षांपूर्वी पाहिलं होतं. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात या कामाला आपण गती दिली. त्यामुळे आज हा महामार्ग जनतेसाठी खुला होत आहे. बऱ्याचदा स्वप्न कोणीतरी बघतो... त्याची पूर्तता दुसराच कोणीतरी करतो... आणि तिसराच त्याचं उद्घाटन करतो..! हा आजवरचा इतिहास आहे. मुंबईतील ५५ उड्डाणपुलांचं रेखाटन १९७० ते ८० या काळातच सुरू झालं होतं. ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चं असंच काहीसं होतं. १९९० च्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम सचिव अजित पवार यांनी व त्याच्याही आधीच्या काही अधिकाऱ्यांनी या ‘एक्स्प्रेस वे’चं डिझाइन करून ठेवलं होतं; पण पैसे कसे उभे करायचे, या विवंचनेत तो मार्ग कागदावरच होता. नितीन गडकरी आले आणि त्यांनी पैसे कसे उभे करायचे, हे दाखवून दिलं. त्यातून ५५ उड्डाणपुलांसह ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मार्गी लागला. १९९५ मध्ये तांबे-देशपांडे या अधिकाऱ्यांच्या जोडगोळीने एमएसआरडीसीचा मार्ग मोकळा केला, हा इतिहास आहे. आपण ज्या महामार्गाचं स्वप्न पाहिलं, तो पूर्णही केला आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे. असं फार क्वचित घडतं. या कामात आपल्याला तत्कालीन एमएसआरडीसीचे मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भक्कम साथ लाभली. त्यामुळेच आपण दोघंही अभिनंदनास पात्र आहात. आपलं सरकार ‘ईडी’चं सरकार, असं म्हटलं गेलं; पण ‘ईडी’ चांगलं काम करू शकते, हे आपण उदाहरणासह दाखवलं आहे.
आपल्याकडे मुंबई-पुणे हा अवघ्या ९४ किलोमीटरचा महामार्ग होता. जगाचा विचार केला, तर नॉर्थ अमेरिका ते साऊथ अमेरिका असा ४८ हजार किलोमीटर लांबीचा महाकाय हायवे जगात एकमेव आहे. जगाच्या स्पर्धेत महाराष्ट्र कुठेही नव्हता. जगाचं कशाला...? आपल्या देशात दिल्ली-अमृतसर-कतार हा एक्स्प्रेस वे ६३३ किलोमीटरचा आहे. तोदेखील अद्याप संपूर्णत: झालेला नाही. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे तयार होत आहे, त्याला आणखी काही कालावधी लागणार आहे. त्याआधी भारतातील सर्वांत जास्त लांबीचा ७०१ किलोमीटर नागपूर ते मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा, नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटरचा रस्ता आज खुला होईल. आपण पाहिलेलं स्वप्न आपल्याच कालावधीत पूर्ण होतानाचा आनंद शब्दातीत आहे. मधल्या अडीच वर्षांच्या काळात कोविडमुळे आणि राजकीय घडामोडींमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडलं. अन्यथा, याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालावधीत झालं असतं. आपण तो राजकीय योगही बरोबर साधला..! राजकारण आणि समाजकारण याचा तोल साधत आपण हे साध्य केलं. त्या राजकीय काैशल्याबद्दल काैतुकच. मात्र, आता अन्य काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल.
मुंबई-गोवा महामार्गाचं घोंगडं भिजत पडलं आहे. असंख्य वेळा आंदोलनं झाली. हा मार्ग कधी पूर्ण होणार की, यासाठी त्या मार्गावरचा कोणी मुख्यमंत्री व्हावा लागेल का..?, असे प्रश्न विचारले जात आहेत. नको ते विषय लोकांच्या डोक्यात येण्याआधीच हा प्रश्न मार्गी लावा. मराठवाडा, खान्देशचे मुंबईशी जोडणारे रस्ते जर चांगले झाले तर, त्या विभागांनाही विकासाचं वारं स्पर्श करील. याशिवाय काही वेगळे प्रश्नही आहेत. त्यात आपल्यालाच लक्ष घालावं लागेल. काही आमदार त्यांना हवं ते काम कशा पद्धतीनं करून घेत आहेत, याच्या सुरस कथा रोज येत आहेत. एकच काम सकाळी एक आमदार त्याला हवं तसं करून घेतो, दुसरा आमदार दुपारी जाऊन तेच काम बदलून घेतो. त्यामुळे प्रशासनात नेमकं ऐकायचं कुणाचं, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. त्यावरून पोलिस दलातही वेगवेगळ्या चर्चा आहेत. आपण फाईल मंजूर करून पाठवलीही असेल. मात्र, ती मुख्यमंत्री कार्यालयात अडकली की अन्य कुठे..? याचाही शोध आपल्यालाच घ्यावा लागेल. महाराष्ट्रातील ५०० हून जास्त अधिकारी विनापोस्टिंग घरी बसून पगार घेत आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला हे परवडणारं आहे का..? काही अधिकाऱ्यांच्या दर दहा-बारा दिवसाला बदल्या होत आहेत. एक किस्सा सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे काही आमदार एका अधिकाऱ्याची बदली करा, अशी तक्रार घेऊन गेले. विलासरावांनी त्यांच्या सचिवाला बोलावलं आणि विचारलं की, अमुक अधिकारी आपण सांगितलेलं काम ऐकतो का..? त्यावर त्या सचिवानं तत्काळ होकारार्थी उत्तर दिलं. तेव्हा विलासराव म्हणाले, जोपर्यंत आपण सांगितलेलं काम ऐकलं जात आहे तोपर्यंत ठीक आहे..! ही जरब त्यांनी कामातून निर्माण केली होती. रोज उठून बदल्या करण्यानं अधिकाऱ्यांमध्ये जरब निर्माण होणार नाही. उलट असंतोष निर्माण होईल. कोणीतरी जोशी नामक व्यक्तीला भेटल्याशिवाय बदल्या होत नाहीत, अशी उघड चर्चा सुरू आहे. अशा चर्चांना वेळीच आवर घालायला हवा. अन्यथा, चांगल्या कामांवर पाणी फिरायला वेळ लागणार नाही. असो! पुन्हा एकदा आपलं अभिनंदन!
- तुमचाच, बाबूराव