महिला वैमानिकांचे अभिनंदन!...यानिमित्ताने पवार साहेबांच्या 'त्या' धोरणाची आठवण झाली - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:02 PM2021-01-11T17:02:51+5:302021-01-11T17:11:37+5:30
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नारी शक्तीचं दर्शन जगाला घडवणाऱ्या या भारतीय महिला वैमानिकांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई : भारतीय महिलांच्या यशाच्या पेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे. एअर इंडियांच्या महिला वैमानिकांनी जगातील सर्वात लांब हवाई मार्ग असलेल्या उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेऊन इतिहास रचला. या विमानाने अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून उड्डाण घेतले. त्यानंतर ही वैमानिकांची टीम उत्तर ध्रुवावरून बंगळुरूला पोहोचली. यादरम्यान, महिला वैमानिकांच्या या टीमने 16,000 किलोमीटरचा पल्ला पार पाडला. या ऐतिहासिक उड्डाणाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
या ऐतिहासिक कामगिरीबाबत महिला वैमानिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नारी शक्तीचं दर्शन जगाला घडवणाऱ्या या भारतीय महिला वैमानिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला धोरण आणून त्यांच्यासाठी अनेक क्षेत्र खुली केली होती, याचीही आठवण यानिमित्ताने झाल्याचे यावेळी रोहित पवार म्हणाले.
"सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू हे १६ हजार किमीचे यशस्वी उड्डाण करुन नारी शक्तीचे दर्शन जगाला घडवणाऱ्या भारतीय महिला वैमानिकांचे अभिनंदन! महिलांच्या याच क्षमतेची जाणीव असल्याने पवार साहेबांनी महिला धोरण आणून त्यांच्यासाठी अनेक क्षेत्र खुली केली होती, याचीही यानिमित्ताने आठवण झाली," असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू हे १६ हजार km चं यशस्वी उड्डाण करुन नारी शक्तीचं दर्शन जगाला घडवणाऱ्या भारतीय महिला वैमानिकांचं अभिनंदन! महिलांच्या याच क्षमतेची जाणीव असल्याने पवार साहेबांनी महिला धोरण आणून त्यांच्यासाठी अनेक क्षेत्र खुली केली होती, याचीही यानिमित्ताने आठवण झाली. https://t.co/16uyFHxxCy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 11, 2021
दरम्यान, पहिल्यांदाच महिला वैमानिकांनी उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून इतिहास घडवला आहे. एअर इंडियाच्या पायलट जोया अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली असून संपूर्ण जगभरातून या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कॅप्टन जोया अग्रवाल यांच्या नेतृत्वात को-पायलट म्हणून त्यांच्यासोबत कॅप्टन पापागरी तनमई, कॅप्टन शिवानी आणि कॅप्टन आकांक्षा सोनवरे होत्या. या ऐतिहासिक कामगिरीनंतर एअर इंडियाने ट्विट केले आहे. वेलकम होम, आम्हाला तुमच्या सर्वांचा अभिमान आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या AI176 पॅसेंजरचे आम्ही अभिनंदन करतो, असे ट्विट एअर इंडियाने केले आहे.