काँग्रेसही सूर्यनमस्काराविरोधात

By admin | Published: August 30, 2016 03:29 AM2016-08-30T03:29:27+5:302016-08-30T03:29:27+5:30

पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार व योग अनिवार्य करण्यास समाजवादी पक्षाकडून विरोध सुरू असताना आता काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागानेही यात उडी घेतली आहे़

Congress against Suryanamaskar | काँग्रेसही सूर्यनमस्काराविरोधात

काँग्रेसही सूर्यनमस्काराविरोधात

Next

मुंबई : पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार व योग अनिवार्य करण्यास समाजवादी पक्षाकडून विरोध सुरू असताना आता काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागानेही यात उडी घेतली आहे़ मुस्लीम धर्मीय विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार घालण्यास भाग पाडू नये, असे साकडेच पालिका आयुक्त अजय मेहता यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घातले़
निवडणुकीचा काळ असल्याने आपल्या मतदारांना नाराज करण्यास काँग्रेसही तयार नाही़ त्यामुळे काँग्रेसनेही यामध्ये सहभागी होत सूर्यनमस्काराच्या सक्तीचा विरोध दाखवून दिला़ विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची आज भेट घेऊन सूर्यनमस्कार अनिवार्य करू नये, अशी विनंती केली़ भाजपाच्या समिता कांबळे यांनी पालिका शाळांमध्ये सूर्र्यनमस्कार अनिवार्य करण्याची ठरावाची सूचना गेल्या आठवड्यात मांडली़ यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतरही बहुमताच्या जोरावर युतीने ही ठरावाची सूचना मंजूर केली़ विरोधी पक्षांमध्ये रोष पसरला असून आठवड्याभरात यावर भूमिका स्पष्ट न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला़ (प्रतिनिधी)

सूर्यनमस्कार ऐच्छिक स्वरूपाचा ठेवण्याची सपाची मागणी
मुंबई : महापालिकेतील शाळामध्ये विद्यार्थ्यांना सुर्यनमस्काराची सक्ती घालण्याच्या सत्ताधारी युतीच्या निर्णयाविरुद्ध समाजवादी पार्टीने सोमवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेवून निवेदन दिले. सुर्यनमस्कार ऐच्छिक स्वरुपात असावा, अशी मागणी सपाचे प्रदेशसचिव महासचिव अब्दुल कादीर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे.
महापालिकेत गेल्या आठवड्यात सत्ताधारी पक्षाने पालिकेच्या शाळांमध्ये सुर्य नमस्कार सक्तीचा करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला आहे. त्याविरोधात सपाने विविध स्तरावर आंदोलन सुरु केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी त्यांनी राज्यपालांची भेट घेवून त्याबाबत पालिकेला सूचना करण्याची विनंती केली. इस्लाम धर्मामध्ये एकच ईश्वर मानला जातो, अल्ला शिवाय इतर कोणालाही वंदन करणे अमान्य आहे.
त्यामुळे राज्य घटनेने दिलेल्या हक्कानुसार सुर्यनमस्काराबाबत सक्ती करणे अयोग्य आहे, असे आझमी यांनी सांगितले. शिष्टमंडळात पालिका गटनेते रईस शेख, नगरसेविका रेश्मा नेवरेकर, मेराज सिद्धीकी, परमहंस सिंह, शाहनवाज खान, अबरार अहमद आदींचा समावेश होता.


विद्यार्थी रोज घालताहेत सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार हा योगाचाच एक प्रकार असून विद्यार्थ्यांमध्ये दररोज सकाळी उत्साह निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये योगाचे प्रशिक्षण दिले जाते़ पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वीच परिपत्रक काढून दररोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना योग करण्यास लावण्यात यावे, असे आदेश दिले होते़

शिक्षण अधिकारी अडचणीत
शिक्षण अधिकाऱ्यांचे हे परिपत्रक तत्काळ रद्द करून सूर्यनमस्कार सक्तीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी समाजवादीने प्रशासनावर
दबावतंत्र सुरू केले आहे़ शिक्षण अधिकाऱ्याच्या निलंबनाचीही मागणी होऊ लागली आहे़

अभिप्रायाच्या प्रतीक्षेत
पालिका सभागृहात मंजूर झालेली ठरावाची सूचना आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येत असते़ मात्र धोरणात्मक निर्णय घ्यायचा असल्यास आयुक्त हा विषय नगरविकास खात्याकडे पाठवीत असतात़
१७७ देशांमधील शाळांमध्ये योग सक्तीचा आहे़ यापैकी ४७ देश मुस्लीम धर्मीय आहेत़
पालिकेच्या ११०० शाळा असून यामध्ये सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर पालिकेच्या चारशे उर्दू शाळांमध्ये एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़

Web Title: Congress against Suryanamaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.