भाजपच्या दडपशाहीविरुद्ध काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:02 AM2020-07-28T05:02:10+5:302020-07-28T05:03:03+5:30

सोमवारी सकाळी थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राजभवनासमोर आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यपालांचा निषेध करण्यात आला.

Congress agitation in front of Raj Bhavan against BJP's oppression in Rajasthan | भाजपच्या दडपशाहीविरुद्ध काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन

भाजपच्या दडपशाहीविरुद्ध काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रातील भाजप सरकार सत्ता आणि पैशांच्या जोरावर देशातील विरोधी पक्षांची राज्य सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत असून राजस्थानचे राज्यपाल त्यास हातभार लावत असल्याचा आरोप करत प्रदेश काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजभवनासमोर जोरदार निदर्शने केली.


सोमवारी सकाळी थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राजभवनासमोर आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोरात म्हणाले, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. पण २०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप सातत्याने जनमताचा अनादर करत आहे. सत्ता आणि पैशांचा गैरवापर करून विविध राज्यांतील विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडणे व अनैतिक व भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवणे हीच भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. त्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयांचा म्हणजे राजभवनांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे.

अनेक राज्यातील सरकारे पाडण्याची षडयंत्रे राजभवनावर शिजली आहेत. राजस्थानात राज्यपालाची भूमिका संशयास्पद आणि पक्षपातीपणाची आहे.


राज्यपाल दबावाखाली
राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली वागत आहेत. दुर्दैवाने राजभवन राजकारणाचे अड्डे बनली आहेत, असा आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

Web Title: Congress agitation in front of Raj Bhavan against BJP's oppression in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.