काँग्रेस प्रचारासाठी टीम चव्हाण मैदानात
By admin | Published: October 5, 2014 12:54 AM2014-10-05T00:54:40+5:302014-10-05T00:54:40+5:30
भाजप, सेना आणि मनसे यांनी विदर्भात प्रचाराचा धडाका लावला असतानाच काँग्रेस प्रचाराची धुरा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांच्या चमूवर टाकण्यात आली आहे.
अभिनेत्री रेखा, गोविंदा यांना विनंती: केंद्रीय नेतेही येणार
नागपूर: भाजप, सेना आणि मनसे यांनी विदर्भात प्रचाराचा धडाका लावला असतानाच काँग्रेस प्रचाराची धुरा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांच्या चमूवर टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्री राज्याच्या विविध भागासह विदर्भ व नागपुरातही प्रचार सभा घेणार आहेत. त्यांच्या मदतीला केंद्रातील व राज्यातील दिग्गज नेत्यांची फौजही मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार अभिनेते गोविंदा व राज्यसभेतील सदस्य अभिनेत्री रेखा यांनाही प्रचारात सहभागी होण्याची पक्षातर्फे करण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचे शनिवारी नागपूरमध्ये आगमन झाले. त्यांनी पारडी येथे प्रचार सभा घेतली. ते नागपूर ग्रामीणमध्येही प्रचार सभा घेण्याची शक्यता आहे. राज्यात प्रचाराची धुरा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांचा समावेश असणाऱ्या चमूवर टाकण्यात आली आहे. या चमूत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्वीजय सिंग, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते बाला बच्चन, माजी मुख्यमंत्री व खा. अशोक चव्हाण आदींचा समावेश आहे. पक्षाचे बहुतांश माजीमंत्री निवडणूक रिंगणात उतरले असल्याने ते त्यांच्या मतदारसंघात व्यस्त आहे. खुद्द पृत्वीराज चव्हाण हे देखील निवडणूक लढवित आहेत. असे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी ते सभा घेत आहेत.
भाजपकडे हेमा मालिनी, स्मृती इरानी, शत्रुघ्न सिन्हा, विवेक ओबेरॉय यांच्यासारख्या सिनेअभिनेत्यांची फौज आहे. ही फौज प्रचारात उतरणार आहे. अभिनेते प्रचारात उतरले की जनता सभेला गर्दी करते, सभेची चर्चा घडून येते. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटातही काँग्रेस समर्थक अभिनेत्यांना प्रचाराच्या रिंगणात उतरविण्याचा विचार सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून अभिनेत्री खा. रेखा व अभिनेता माजी खा. गोविंदा यांना पक्षातर्फे विनंती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)