काँग्रेस उमेदवार धानोरकरांच्या घरावर प्राप्तिकराचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:48 AM2019-04-11T05:48:51+5:302019-04-11T05:49:09+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या चंद्रपुरातील निर्माणाधीन निवासस्थानी बुधवारी दुपारी १ वाजताच्या ...
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या चंद्रपुरातील निर्माणाधीन निवासस्थानी बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास प्राप्तिकर विभागाने छापा घातली. दीड-दोन तास कसून चौकशी केल्यानंतरही काहीच न सापडल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
चंद्रपूर मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल परिसरात धानोरकर यांच्या नवीन निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. धानोरकरांचे काही कार्यकर्ते तेथे होते. दुुपारी १ वाजेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात प्राप्तिकर विभागाच्या आठ अधिकाऱ्यांनी अचानक छापा घातला. घरातील सोफा, स्नानगृह, शौचालयात कसून पाहणी करण्यात आली. मात्र, काहीच हाती लागले नाही.
निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय उमेदवाराच्या घरी छापा घालता येत नाही. ही धाड राजकीय द्वेषाने प्रेरित होती. भाजपला पराभव दिसत असल्यानेच ही छापा टाकण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.