भिवंडीच्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी
By admin | Published: June 10, 2017 03:01 AM2017-06-10T03:01:33+5:302017-06-10T03:01:33+5:30
भिवंडीच्या महापौरपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जावेद दळवी विजयी झाले, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडीच्या महापौरपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जावेद दळवी विजयी झाले, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड झाली. दळवी यांनी भाजपाच्या प्रकाश टावरे यांचा, तर काटेकर यांनी शाहीन सिद्दिकी यांचा पराभव केला.
विशेष महासभेच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे होते, तर या सभेसाठी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे व आयुक्त योगेश म्हसे उपस्थित होते. महापौरपदासाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी विलास पाटील, सुमित पाटील, मदन पाटील यांच्यासह पाच जणांनी अर्ज मागे घेतल्याने केवळ दळवी व टावरे रिंगणात होते. सदस्यांनी हात वर करून मतदान केले. त्यामध्ये दळवी यांना ६२, तर टावरे यांना २८ मते मिळाली.