काँग्रेसला आव्हान भाजपाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 01:01 AM2017-02-17T01:01:46+5:302017-02-17T01:01:46+5:30
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहराची सत्ता ज्यांच्यासाठी दीड तपांपासून दिवास्वप्न ठरले, त्या भाजपात ‘मोदीं’च्या प्रभावामुळे
गणेश देशमुखे / अमरावती
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहराची सत्ता ज्यांच्यासाठी दीड तपांपासून दिवास्वप्न ठरले, त्या भाजपात ‘मोदीं’च्या प्रभावामुळे अचानक विश्वास निर्माण झाला आहे. काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष या निवडणुकीत दिसणार आहे.
अमरावती हे विदर्भातील नागपूरनंतरचे मोठे शहर. तपस्वींच्या वास्तव्याने इंद्रपुरी, अंबादेवीच्या पावन स्पर्शाने अंबापुरी-अंबानगरी, तसेच आता अमरावती असा इतिहास असलेल्या या नगरीने नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता सोपविली आहे.
अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्याने भाजपाला निर्णायक कौल दिला. जिल्ह्यात ठिय्या देऊन बसलेले अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांची व्यूहरचना त्यासाठी महत्त्वाची ठरली होती. महापालिकेच्या विजयाची प्रमुख जबाबदारी अमरावतीचे भाजपचे आमदार सुनील देशमुख यांना सोपविण्यात आली आहे. महापालिकेत भ्रष्टाचारी नगरसेवकांची टोळी अर्थात ‘गोल्डन गँग’ कार्यरत असल्याचा आरोप करून देशमुखांनी खळबळ उडवून दिली होती. महापालिकेतील भ्रष्टाचारावर शब्दचाबकांचे फटके मारणाऱ्या देशमुखांना ‘क्लीन टीम’ निवडून आणण्याची संधी यावेळी चालून आली आहे. भूषविलेले पालकमंत्रिपद आणि काँग्रेस पक्षातील खाचखळग्यांची माहिती ही त्यांची जमेची बाजू. भाजपात तिकिटाच्या मुद्यावरून दुखावलेल्यांची संख्या मोठी आहे.
अनेक ‘विनिंग कॅन्डिडेटस्’ना डावलले गेले. मेरिटऐवजी जवळीक, या सूत्रामुळे कार्यकर्त्यांत खदखदणारी ‘बदले की भावना’ भाजप किती कौशल्यपूर्णरीत्या हाताळू शकेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेशी तुटलेली युती जशी अडचण वाढविणारी ठरली, तसेच शहर विकासाला गती देणारे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा घेतलेला बळी, हा मुद्दाही भाजपला जड जाणारा आहे.
सत्तेशी जवळचे नाते राखणाऱ्या काँग्रेसला यावेळी घाम गाळावा लागत आहे. महापालिकेचे मावळते उपमहापौर काँग्रेसचे शेख जफर हे कुख्यात गुंड. अनेक महिने उपमहापौर कार्यालयाला कुलूप आणि जफर फरार, अशी स्थिती होती; तरीही त्यांचे पद काँग्रेसने कायम ठेवले. राज्यात सत्ता भाजपाची आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर जफर यांच्या तडिपारीचा प्रस्ताव तयार झाला आहे. तडीपार कारवाईची ही तिसरी वेळ होय. अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली ती कधी काळी शरद पवार यांचे खासे विश्वासू असलेले संजय खोडके यांनी! पवारांनी खोडकेंशी ऐनवेळी खेळी खेळली. खोडके त्यामुळे दोन वर्षांपासून काँग्रेसवासी झाले आहेत. राष्ट्रवादी अस्तित्वशून्य झाली आहे.