काँग्रेसने खड्ड्यांमध्ये केले मुख्यमंत्र्यांचे बारसे

By admin | Published: August 25, 2016 03:43 AM2016-08-25T03:43:41+5:302016-08-25T03:43:59+5:30

शहरातील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Congress chief ministers in potholes | काँग्रेसने खड्ड्यांमध्ये केले मुख्यमंत्र्यांचे बारसे

काँग्रेसने खड्ड्यांमध्ये केले मुख्यमंत्र्यांचे बारसे

Next


कल्याण : शहरातील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, केडीएमसी प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने पक्षाने बुधवारी अनोखे आंदोलन छेडत खड्ड्यांचे बारसे घातले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन यांच्यासह सर्व स्थानिक आमदारांची नावे खड्ड्यांना दिली. १० दिवसांत रस्ते सुस्थितीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या वेळी दिला.
महिनाभरापासून कल्याण-डोंबिवली शहरांतील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्याला सर्वस्वी सत्ताधारी शिवसेना-भाजपा व प्रशासन कारणीभूत आहे, असा आरोप करत कल्याण शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शैलेश तिवारी यांनी तीन दिवसांपासून चक्कीनाका येथे बेमुदत उपोषण छेडले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, सेवा दल अध्यक्ष नवेंदू पाठारे, मानव अधिकार सेलचे अध्यक्ष पॉली जेकब आदी पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
मनसेने मंगळवारी डोंबिवलीत खड्ड्यांच्या मुद्यावर अनोखे आंदोलन छेडल्यानंतर बुधवारी काँग्रेसनेही आक्रमक होत खड्ड्यांचे बारसे घातले. खड्ड्यांच्या ठिकाणी पाळणा हलवून मुख्यमंत्र्यांसह राज्यमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त तसेच सत्ताधारी शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांचा नामकरण विधीही पार पडला.
या वेळी नागरिकांना घुगऱ्या आणि पेढ्यांचे वाटप केले. या आंदोलनानंतर तरी निर्लज्ज प्रशासन आणि सत्ताधारी जागे होऊन रस्त्यांवरील खड्डे भरतील, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी या वेळी व्यक्त केली.
तर, कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूकपूर्व निर्णयामुळे आर्थिक दिवाळखोरीत सापडली असून खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या प्राजक्ता फुलोरे हिला महापालिकेच्या हलगर्जीमुळेच जीव गमवावा लागल्याचा आरोप या वेळी सेवा दलाचे अध्यक्ष पाठारे यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Congress chief ministers in potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.