काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; समान निधीवाटपाची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 02:49 AM2021-04-04T02:49:24+5:302021-04-04T02:50:11+5:30
शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा, त्यांच्यासमोर सगळे मुद्दे मांडा, असे सांगितल्यामुळे शनिवारी सकाळी हे शिष्टमंडळ ‘वर्षा’वर पोहोचले.
मुंबई : किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटक पक्षांच्या आमदारांना समान निधीचे वाटप होते की नाही हे पाहा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली.
शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा, त्यांच्यासमोर सगळे मुद्दे मांडा, असे सांगितल्यामुळे शनिवारी सकाळी हे शिष्टमंडळ ‘वर्षा’वर पोहोचले. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती नंतर प्रभारी पाटील यांनी दिली.
राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाययोजनांसंदर्भातही यावेळी चर्चा झाली. गरज पडली आणि रुग्णांची संख्या वाढू लागली तर, मुख्यमंत्री जे कोणते निर्णय घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असा विश्वासही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला. राष्ट्रवादीने मात्र लॉकडाऊनविषयी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शनिवारच्या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली.
पाटील म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली होती त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशीही मागणी केली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली, असेही ते म्हणाले.