सरसकट कर्जमाफीची काँग्रेसची मागणी

By admin | Published: June 25, 2017 02:21 AM2017-06-25T02:21:16+5:302017-06-25T02:21:16+5:30

दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Congress demand for overall debt waiver | सरसकट कर्जमाफीची काँग्रेसची मागणी

सरसकट कर्जमाफीची काँग्रेसची मागणी

Next

विशेष प्रतिनिधी 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव कर्जमाफीमध्ये सरकारने केल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र, सरकारने मन मोठे करून सरसकट कर्जमाफी दिली असती तर आणखी समाधान झाले असते, असे सांगितले.
सरकारच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, यावर पक्षाचे लक्ष असेल, असेही तटकरे म्हणाले. दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे झाला, असे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि, तटकरे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात हा निर्णय म्हणजे शुक्रवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेचे फलित असल्याचा दावा केला. शनिवारच्या घोषणेतून काही गोष्टी जर सुटल्या असतील तर सरकारसमोर पुन्हा एकदा भूमिका मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केला जाईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचे मी जाहीर करतो, असे पत्रकात म्हटले आहे.

संघर्ष यात्रा अन्  संपाचे यश
काँग्रेसच्या तीनही बड्या नेत्यांनी मात्र, आधी सरसकट कर्जमाफी करण्याच्या सरकारच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल केला आहे. कर्जमाफीची घोषणा हे काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे आणि त्यानंतर झालेल्या शेतकरी संपाचे फलित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
दीड लाखाची मर्यादा न ठेवता सरसकट माफी द्या, असे त्यांनी तसेच पृथ्वीराज चव्हाण, विखे पाटील यांनी म्हटले आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर आमची नजर असेल, असे ते म्हणाले.


ऐतिहासिक निर्णय - खा. दानवे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य भूमिका सरकारने घेतली आहे. राज्य सरकारवर आर्थिक बोजा आला तरी सरकार शेतीमधील भांडवली गुंतवणूक करतच राहील हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही महत्त्वाचे आहे.

पाने पुसली
- रघुनाथदादा
कर्जमाफीच्या निर्णयाने आम्ही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन या सरकारने दिले होते. सर्वच कर्जाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. ही कर्जमाफी म्हणजे गाजर दाखविण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.

Web Title: Congress demand for overall debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.