इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: October 7, 2015 01:46 AM2015-10-07T01:46:51+5:302015-10-07T01:46:51+5:30
राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयांसमोर निदर्शने केली.
मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयांसमोर निदर्शने केली.
दरवाढ मागे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. सांगली, ठाणे आदी ठिकाणी सायकल मोर्चा काढण्यात आला, तर औरंगाबादला बंद दुचाकी ढकलण्याची स्पर्धा घेऊन दरवाढीचा निषेध करण्यात आला.
करवाढ आणि दरवाढ लादून जनतेच्या खिशातून पैसे काढण्याऐवजी राज्य सरकारने वर्धापन दिनानिमित्त कोट्यवधी रुपयांच्या नियोजित जाहिराती रद्द करून तो पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार ५ आणि ६ आॅक्टोबरला राज्यभर आंदोलन झाले. (प्रतिनिधी)
मनपा निवडणुकीवर चर्चा : कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड मंडळाची मंगळवारी टिळक भवनात बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील, खा. राजीव सातव, विश्वजित कदम, आ. भाई जगताप व दोन्ही महानगर पालिकांशी संबंधित जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.