काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल

By Admin | Published: June 15, 2017 10:07 AM2017-06-15T10:07:54+5:302017-06-15T11:12:40+5:30

शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Congress filed a complaint against Congress leader Abdul Sattar | काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15-  शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल सत्तार यांच्यासह इतर 32 जणांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अब्दुल सत्तार औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार आहेत. सिल्लोडमधील एका शेतकऱ्याला शेतात जाऊन मारहाण केल्याचा आरोप त्या शेतकऱ्याने केला होता. त्यानुसार सत्तार यांच्यावर ही कारवाई झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 12 जून रोजी ही घटना घडली होती.  व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार त्यांच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्ते शेतात घेऊन गेलेले दिसत आहेत. तसंच त्यावेळी बाचाबाची झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं आहे.
 
काय आहे प्रकरण?
 
मारहाण झालेल्या शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन दहेगाव शिवारात गट नंबर ३६ व ३८मध्ये आहे. ते १२ जून रोजी शेतातमका पेरत असताना आमदार अब्दुल सत्तार आणि इतर २० ते ३० कार्यकर्ते शेतात आले. आमदार सत्तार यांनी, ही जमीन माझी असून, तुम्ही येथून निघून जा, येथे पाय ठेऊ नका, असं म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. ‘आम्ही गरीब लोक असून ही वडिलोपार्जित जमीन आहे. शेतात मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो,’ अशी विनंती केली, मात्र आम्हाला मारहाण केली, असं त्या शेतकऱ्याने अर्जात म्हटलं आहे.
आमदारांच्यासोबत आलेल्या २५ ते ३० जणांनी मारहाण केली. त्यानंतर आम्ही त्यांच्या तावडीतून सुटून पळत असताना पाठलाग करण्यात आला. यावेळी आमच्या जिवाचं बरंवाईट झालं असतं. या घटनेमुळे कुटुंबीय व आम्ही भयभीत झालो आहोत, असं शेतकऱ्याने तक्रारीत म्हटलं आहे. हे राजकीय कुटुंब असल्याने माझ्या व माझ्या कुटुंबांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी विनंती तक्रारीत करण्यात आली आहे.
 
पण हे प्रकरण लोकप्रतिनिधीचं असल्याने सुरूवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला टाळाटाळ केली होती. पण नंतर माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यावर तक्रार नोंदवली गेली आणि कारवाई करण्यात आली, अशी माहिती समोर येते आहे.  
दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांनी,  शेतकऱ्याला शिवीगाळ केली पण मारहाण केली नाही, असं स्पष्ट केलं आहे. यावर आता नेमकी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Web Title: Congress filed a complaint against Congress leader Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.