काँग्रेसचा अखेर शिवसेनेला ‘हात’
By admin | Published: March 21, 2017 03:38 AM2017-03-21T03:38:55+5:302017-03-21T03:38:55+5:30
एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार
ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर मंगळवारअखेर शिक्कामोर्तब होणार असून, काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीचे सदस्यपद मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यातून पारदर्शकतेचा डिंगोरा पिटणाऱ्या भाजपाला बाहेर ठेवण्यात शिवसेना अखेर यशस्वी झाली आहे.
ठाणे महापालिकेची सत्ता प्रथमच एकहाती संपादित करून शिवसेनेने एक नवा इतिहास रचला. परंतु, तरीदेखील स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी किंबहुना स्थायीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी शिवसेनेकडून नवी राजकीय समीकरणे जुळवण्याच्या हालचालींना मागील काही दिवसांपासून वेग आला होता. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य निवडून जाणार आहेत. परंतु, आठ सदस्य शिवसेनेचे गेल्यास विरोधी बाकावर असलेले राष्ट्रवादी व भाजपा हे अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेसला हाताशी घेऊन शिवसेनेच्या हातातोंडातील घास काढून घेण्याच्या तयारीला लागले होते. परंतु, शिवसेनेने ही चाल ओखळली आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरू केली होती. तसेच एक अपक्ष आणि एमआयएमलादेखील बरोबर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, आता शिवसेनेचे आठ आणि काँग्रेसचा एक अशी समीकरणे जुळवून स्थायी समितीदेखील एकहाती आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीत स्थान तर मिळणार आहेच, शिवाय एक स्वीकृतदेखील त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. एकूणच मागील कित्येक दिवस काँग्रेस कोणाबरोबर जाणार, या चर्चेला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळणार आहे. ते शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
तीन जागा तरीही काँगे्रसला लॉटरी-
ठाण्यात काँग्रेस नुकत्याच झालेल्या महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून लढली होती. मात्र, त्यांना अपेक्षित असे यश मिळवता आलेच नाही. त्यांच्या अवघ्या तीनच जागा निवडून आल्या. त्यामुळे पालिकेत त्यांना कोणत्याही ठिकाणी स्थान मिळणार नाही, अशी शक्यताही निर्माण झाली होती.
परंतु, आता स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला गळ घातली आहे. २०१२ मध्येदेखील त्यांनी अशाच प्रकारे काँग्रेसला राष्ट्रवादीपासून वेगळे करून स्वतंत्र गटाची निर्मिती करण्यास भाग पाडले होते.
च्तीच खेळी शिवसेनेने या निवडणुकीतही खेळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी घरोबा करण्यास टाळाटाळ केली. त्याचाच फायदा आता त्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२३ जागा जिंकूनही भाजपाच्या हाती कटोरा
स्थायीची समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेना आपल्याला टाळी मागेल, अशी आशा २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला होती. परंतु, पारदर्शकतेच्या या पहारेकऱ्याला सत्तेत कोणताच वाटा न देण्याची भूमिका एकहाती सत्ता आल्यापासून शिवसेनेने घेतली होती. त्यामुळेच भाजपाबरोबर युती करण्याऐवजी त्यांनी आता काँग्रेस आणि अपक्षांना हाताशी घेऊन सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचल्या आहेत. त्यामुळे भाजपाची स्थायीसाठी शिवसेनेसोबत युती होण्याच्या आशादेखील मावळल्या आहेत. एकूणच आता त्यांना पहारेकरीच्याच भूमिकेत पुढील पाच वर्षे काम करावे लागणार आहेत.