नगरपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
By Admin | Published: January 12, 2016 04:33 AM2016-01-12T04:33:13+5:302016-01-12T04:33:13+5:30
राज्यातील १७ नगरपंचायत निवडणुकींमध्ये २८९पैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून, त्याखालोखाल ७८ जागा जिंकलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.
मुंबई - राज्यातील १७ नगरपंचायत निवडणुकींमध्ये २८९पैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून, त्याखालोखाल ७८ जागा जिंकलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचा पुरता धुव्वा उडाला. सेनेला ५७ तर भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावे लागले.
राज्यात १७ नगरपंचायती व दोन नगरपालिकांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत घवघवीत यश मिळवले. १७पैकी नायगाव व हिमायतनगर (नांदेड), उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदुरबार जिल्ह्यातील आक्राणी, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व कोरपना या ७ नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या यशाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व शेवगाव, रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि म्हसळा अशा चार नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बुहमत पटकावले. चार नगरपालिकांसह एकूण ७८ जागा जिंकून जोरदार मुंसडी मारली आहे. यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील जामखेड नगरपालिकेत भाजपाचा दारुण पराभव झाला. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड व अहमदनगर महानगरपालिकेच्या तसेच निलंगा व हिंगणघाट नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला रायगड जिल्ह्यातील तळा आणि पोलादपूर नगरपालिकेत बहुमत मिळाले.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्णातील गोंडपिंपरी, जिवनी व कोरपना या तीन नगर पंचायतीत भाजपाचा दारुण पराभव झाला. कोरपना येथील एकही जागा भाजपाला जिंकता आलेली नाही.
पुरस्कृत अपक्षही विजयी
राज्य निवडणूक आयोगाकडील अधिकृत आकडेवारीनुसार, काँग्रेस १०४ तर राष्ट्रवादीला ७८ जागा मिळाल्या आहेत. मात्र ही आकडेवारी चिन्हावर लढलेल्या उमेदवारांची असून, काही ठिकाणी पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार निवडून आल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे.
चेंबूरची जागा शिवसेनेकडे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे समर्थक अनिल पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे झालेल्या महापालिकेच्या चेंबूर-घाटला प्रभागात पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पाटणकर विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र नगराळे यांचा पराभव केला.