काँग्रेसमुक्त देश ही फॅसिस्ट दृष्टी
By Admin | Published: April 4, 2016 02:57 AM2016-04-04T02:57:18+5:302016-04-04T02:57:18+5:30
काँग्रेसमुक्त भारत देश करण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला घातक आहे. हा दृष्टीकोन फॅसिस्ट विचारांचा आहे. ही परिस्थिती चिंंताजनक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली़
पुणे : काँग्रेसमुक्त भारत देश करण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला घातक आहे. हा दृष्टीकोन फॅसिस्ट विचारांचा आहे. ही परिस्थिती चिंंताजनक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली़
वानवडी येथील विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, राजकारणात अस्पृश्यता नसावी; विचारसरणीला विरोध करा, व्यक्तिमत्त्वाला नको, मात्र एक विचारसरणीच देशातून मुक्त करा हे बोलणे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही.
ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य़, भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार वंदना चव्हाण व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमताने हे सरकार आले. अर्थिक सुधारणा व विकास या दिशेने देश जातोय असे दाखवतात ही एक बाजू, दुसऱ्या बाजुने आम्ही काहीही करू शकतो, देशाची सत्ता आमच्या हातात आहे; हवे ते करू, अशी प्रवृत्ती प्रभावी झाली आहे. हे असेच चालू राहिले तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. याचे परिणाम वेगळे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात अजून त्याचा प्रभाव जाणवत नाही. शासकीय समित्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीचे लोक कसे राहतील याची काळजी घेतली जाते, असे त्यांनी सांगितले़ भाई वैद्य यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल विठ्ठलराव शिवरकर यांचा गौरव केला व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.