महागाईविरोधात काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:15 PM2017-10-02T22:15:37+5:302017-10-02T22:15:59+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. भाजप सरकार जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. यात शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी वाढत्या महागाईविरोधात निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मोर्चा सुरूवात करण्यात आली.
महिनाभराच्या कालावधीत पेट्रोल, डिझेलचे दर ८० रुपये लिटरवर पोहोचले, विविध वस्तूंवर कराची आकारणी करुन सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे. रेल्वेमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी भाजप सरकार बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न दाखवित आहे. भाजप सरकारचा खरा चेहरा आता पुढे आला असून जनताच या सरकारला धडा शिकविल्या राहणार नाही, असे प्रतिपादन आ.अग्रवाल यांनी केले. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती आहे. धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव देण्याची घोषणा भाजपा सरकारने केली होती. मात्र त्याचा सुध्दा या सरकारला विसर पडला आहे.
सरकारने शेतकºयांना ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचा गाजावाजा केला. मात्र विविध अटी लादून ६० टक्के शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप आ.अग्रवाल यांनी केला. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेला जी जी आश्वासन दिली होती. त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन अग्रवाल यांनी मोर्चात उपस्थित नागरिकांना केले. काँग्रेस भोला भवन येथून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.
उपविभागीय कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करुन विविध मागण्याचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. वाढत्या महागाईला प्रतिबंध लावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या, जीवनाश्यक वस्तूंचे दर आटोक्यात आणा, शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश होता. या मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, माजी जिल्हाध्यक्ष के.आर.शेंडे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस महासचिव सहसराम कोरोटे, नामदेव किरसान, अमर वºहाडे, विनोद जैन, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, नगरसेवक राकेश ठाकूर, जि.प.सभापती विमल नागपूर, पी.जी.कटरे, जि.प.सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.