राष्ट्रवादीसाठीचा खड्डा काँग्रेसला भारी ठरला
By admin | Published: October 20, 2014 05:22 AM2014-10-20T05:22:44+5:302014-10-20T05:22:44+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कायम पाण्यात पाहिले. त्यांना अडचणीत आणण्याची संधी त्यांनी सोडली नाही.
अतुल कुलकर्णी, मुंबई
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कायम पाण्यात पाहिले. त्यांना अडचणीत आणण्याची संधी त्यांनी सोडली नाही. याच राष्ट्रवादीला संपविण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात तेच पडले आणि स्वत:च्या पक्षालाही त्यात लोटून दिले.
त्यांच्या या व्यक्तिगत भांडणाची जबर किंमत काँग्रेसला मोजावी लागली आहे. सगळे निर्णय स्वत:च घ्यायचे, स्वत:शिवाय कोणालाही मोठे होऊ द्यायचे नाही आणि येणाऱ्याकडे संशयाने पाहत दुसऱ्याला पाण्यात पाहण्याचे राजकारण करण्याची त्यांची वृत्ती महाराष्ट्रात काँग्रेसला हानिकारक ठरली. शिवाय निर्णय न घेण्याच्या त्यांच्या स्वभावाचे मोठे दूरगामी आर्थिक परिणाम महाराष्ट्रावर होतील ते वेगळेच. जलसिंचनावर श्वेतपत्रिका काढण्याची भूमिका घेत त्यांनी राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे राज्यभर संशयाचे वातावरण गडद झाले. कोणत्याही प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय काम करायचे नाही असे आदेश काढले. पर्यायाने आधीच बदनाम अधिकाऱ्यांनीदेखील हात वरती करत जे काय निर्णय घ्यायचे ते मंत्रिमंडळाने घ्यावेत अशी भूमिका घेतली. परिणामी राज्यात तीन वर्षांत जलसिंचनाची कामेच ठप्प झाली.
प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत हेच घडले. वरळी ते हाजीअली सी-लिंकऐवजी कोस्टल रोड कमी खर्चाचा अशी भूमिका चव्हाणांनी घेतली. मात्र ना कोस्टल रोड केला ना सी-लिंक केला. पर्यायाने याही प्रकल्पाची किंमत हजारो कोटींनी वाढून गेली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन-तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आत केल्या गेल्या मात्र आघाडी सरकार स्थापन करण्याच्या आधीपासून वीज खात्यात काम करणारे अजय मेहता सरकार गेले तरीही अजून त्याच जागेवर आहेत.
दुसऱ्या पक्षातीलच नाही, तर स्वपक्षातील सहकारी नेतेदेखील कसे अडचणीत येतील अशाच भूमिका त्यांनी कायम घेतल्या. मतदान काही तासांवर आलेले असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांवर आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ज्या पद्धतीने आक्षेप घेतले तो कळसाध्याय होता.
जाता जाता त्यांनी बिल्डरांच्या सोयीचे अनेक निर्णय घेतले. राष्ट्रपतींनी सही करूनही हाउसिंग रेग्यूलेटर बिल्डरांच्या दबावामुळे चव्हाणांनी लागू केले नाही. सिडको विमानतळ केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाही त्यांना मार्गी लावता आले नाही. एकही मोठा उद्योग यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. उलट उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उद्योगधोरण तयार केले तेदेखील वर्षभर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच पडून राहिले. या सगळ्याचा परिपाक आघाडी तुटण्यात झाला. त्यानंतरही पक्षाने ज्यांना तिकिटे दिली त्यांच्यासाठी जी मदत लागते तीदेखील देण्यात पुढाकार घेतला नाही. पक्षाच्या जाहिरातीदेखील त्यांनी स्वत:भोवतीच ठेवल्या. स्वत:ची स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याच्या नादात त्यांनी चांगले काम करणाऱ्या सहकारी मंत्र्यांच्या कामांच्या जाहिराती कधी केल्या नाहीत. या सगळ्या प्रकारामुळे नारायण राणे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुशीलकुमार शिंदे यांनी आपापल्या मतदारसंघातच स्वत:ला मर्यादित करून घेतले. माणिकराव ठाकरे यांना तर पुत्रप्रेमापुढे राज्यातील २८७ मतदारसंघ परके झाले. या सगळ्यात अनेक चांगले निर्णय घेणारे मंत्री, सरकारसोबत असतानाही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याचे विश्लेषण आता अनेक दिवस चालेलही... हाती काहीच उरलेले नाही.