काँग्रेसने बाजी मारली!
By admin | Published: December 9, 2015 01:23 AM2015-12-09T01:23:40+5:302015-12-09T01:23:40+5:30
काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावर जबरदस्त मोर्चा काढून पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये जान आणली आणि मोर्चा यशस्वी करीत
अतुल कुलकर्णी, नागपूर
काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावर जबरदस्त मोर्चा काढून पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये जान आणली आणि मोर्चा यशस्वी करीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसवर आपली पकड मजबूत केली आहे. मागच्या अधिवेशनावर काढलेला मोर्चा फसल्याने त्याच्याशी आपला संबंध नाही म्हणणारे देखील आज हिरीरीने आपण कसे नियोजन केले हे सांगण्यात मशगुल झाले होते हे विशेष!
मोर्चाला किती लोक हजर होते हे सांगण्यासाठी पोलीसही टाळाटाळ करत होते. मात्र खाजगीत किमान लाख, सव्वा लाख लोक आले होते असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. खा. अशोक चव्हाणांनी दीड लाखावर गर्दी गेल्याचे सांगितले.
किती गर्दी होती हा मुद्दाच आजच्या मोर्चाने संपवला असून या मोर्चाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खा. अशोक चव्हाण यांनी अत्यंत बारकाईने केलेले नियोजन, प्रत्येकाला वाटून दिलेली कामे आणि त्यावर ठेवले गेलेले नियंत्रण यामुळे राज्यपातळीवर या मोर्चाने एकाचवेळी अनेक संदेश देण्याचे काम केले. अशोक चव्हाण यांनी संघटनेवर मजबूत पकड निर्माण केली, सरकारविषयी जनतेच्या मनात कटुताही निर्माण केली आणि मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये व पक्षात जान आणण्याचेही काम या मोर्चाने केले.
पक्षाचे राज्यातले सगळे ज्येष्ठ नेते आजच्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आले. पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्यासह विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र अशा सगळ्या भागातले नेते, आमदार या निमित्ताने एकत्र आले.विधीमंडळाचे कामकाज कसे बंद करायचे, त्यासाठी काय नियोजन करायच२२२े, यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचीही पडद्याआड मदत घेतली. पडद्याआड केलेले नियोजन कामी आले आणि आज काँग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादीचे आमदारही वेलमध्ये घोषणा देत उतरले. राष्ट्रवादी आमदारांच्या हातातही फलक होते. काँग्रेस राष्ट्रवादीतील कटुताही यानिमित्ताने कमी झालेली पहायला मिळाली.
> विधानसभेत गदारोळ सुरू होता. आम्हाला चर्चा नकोच आहे, कर्जमाफीची घोषणा करा, असे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सांगत होते मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील बोलायला उभे राहिले. सरकारने प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.
महसूलमंत्री एकनाथ खडसे तात्काळ उभे राहिले आणि आमची चर्चा करण्याची तयारी आहे, सुरू करा चर्चा अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यावर शेजारीच बसलेल्या अजित पवारांनी तात्काळ जयंत पाटील यांना चर्चा मागायची नाही असे ठरले आहे, शांत बसा, असे सांगितले. काँग्रेसच्या कर्जमाफी मोर्चाचे महत्त्व कमी करण्यासाठीच जयंत पाटील यांनी हा विषय काढल्याची चर्चा आज विधीमंडळ परिसरात होती.
> नागपूरच्या गुलाबी थंडीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आपापसातील अनोख्या हातमिळवणीची चर्चा रंगली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ८ तारखेला काँग्रेसचा मोर्चा निघेल. त्यासाठी राष्ट्रवादीने सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यासाठी सहकार्य करायचे आणि १० तारखेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना जायचे असल्याने त्यादिवशीचे कामकाज कसे गुंडाळता येईल यासाठी राष्ट्रवादीने त्यांना मदत करायची.
या हातमिळवणीची चर्चा आज दिवसभर विधीमंडळ परिसरात रंगली होती. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले. मात्र हे करताना सत्ताधारी पक्षाने देखील जेवढे कामकाज होते तेवढे सगळे उरकून घेतले. आता १० तारखेला राष्ट्रवादीची नेते मंडळी नागपूरबाहेर जातील.