काँग्रेसला शिवसेनेचेच आव्हान
By admin | Published: October 1, 2014 11:09 PM2014-10-01T23:09:53+5:302014-10-02T00:07:54+5:30
तीन अपक्षांचे अर्ज मागे, सहाजण रिंगणात, राज्याचे लक्ष कुडाळकडे
रजनीकांत कदम -कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार हे निश्चित झाले आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी काँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. नऊ उमेदवारांपैकी तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने कुडाळ मतदारसंघात सहा उमेदवार रिंगणात उभे राहिलेले आहे.
कुडाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये काँग्र्रेसकडून काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राष्ट्रवादीकडून माजी आमदार पुष्पसेन सावंत, भाजपाकडून विष्णू मोंडकर, बसपाकडून रवींद्र कसालकर, तर अपक्ष म्हणून स्नेहा केरकर, लवू वारंग, किशोर शिरोडकर व देऊ तांडेल यांनी उमेदवारी अर्ज भरला असून हे सर्व अर्ज वैध ठरले होते. यातील लवू वारंग, किशोर शिरोडकर व देऊ तांडेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष व चार अपक्ष उमेदवार मिळून नऊ जणांनी अर्ज भरले, तरी प्रमुख लढत ही काँग्रेसचे नारायण राणे व शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यातच होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
या मतदारसंघात काँगे्रसकडून नारायण राणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोर वाढला असून जोमात प्रचार सुरू आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक पराभूत होऊनही गेली पाच वर्षे येथील मतदारसंघात ठाण मांडून जनसंपर्क वाढविणारे वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रचाराचा जोर वाढविला आहे. आघाडी व युती शेवटच्या क्षणी तुटल्यावर उमेदवारी अर्ज भाजपा व राष्ट्रवादीकडून स्वतंत्र उमेदवार देत भरण्यात आला. मात्र, या दोन्हीही पक्षांकडून अजूनही शांत आणि अत्यंत धिम्या गतीने प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे.
भाजपा व राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढत असले, तरी राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्पसेन सावंत व भाजपाचे विष्णू मोंडकर यांना जनतेची मते आपल्याकडे टिकविण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. मोठ्या प्रचार सभा घेणे, कॉर्नर सभा घेणे याकडे काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांनी टाळले असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक गावातील वाडीवस्त्यांवर जात जोरदार प्रचार करीत असून प्रत्येकजण एका एका मताच्या विचार करीत आहे.
कुडाळ मतदारसंघात सुमारे २ लाख ३ हजार मतदार असून कुडाळ व मालवण हे दोन तालुके येतात. गेल्या लोकसभेत सुमारे ७६ टक्के मतदान या मतदारसंघात झाले. या विधानसभेला नवीन आणि अगोदरचे मतदार मिळून ८० टक्केच्या वर मतदान होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्षांकडून मतदारांवर विकासकामांच्या आश्वासनांची खैरात सुरू आहे.
सत्ताधारी पक्षाकडून प्रचारात झालेली विकासकामे, दिलेला निधी व सत्ता आल्यास करण्यात येणारी विकासकामे या मुद्द्यांवर प्रचारात भर दिला जाणार आहे. तर विरोधकांकडून या मतदारसंघातील समस्या आणि सत्ताधाऱ्यांकडून रखडलेली विकास कामे यावर अधिक भर दिला जाणार आहे. या मतदारसंघातून राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे निवडणूक लढत आहेत. लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ सुमारे २१ हजार मतांनी पिछाडीवर होता. तसेच २००९ च्या निवडणुकीत राणे अवघ्या २४ हजार मतांनी निवडून आले होते. राणेंसमोर शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांचे तगडे आव्हान असल्यामुळे राणेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची समजली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
फोटो : 0१ एसडब्लूडी १२
नारायण राणे
फोटो : 0१ एसडब्लूडी १३
वैभव नाईक
फोटो : 0१ एसडब्लूडी १४
पुष्पसेन सावंत