“उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:40 AM2023-04-24T11:40:51+5:302023-04-24T11:41:37+5:30
Maharashtra Politics: तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, असे शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंना सांगितले होते, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: महाविकास आघाडी आणि शिंदे गट तसेच भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत अंतर्गत धुसपूस सुरू असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे एका जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे दिलदार आहेत. असा मुख्यमंत्री होणे नाही, असे कौतुकोद्गार अशोक चव्हाण यांनी काढले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी युती केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पाय उतार व्हायला लागले होते. राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाले. अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना, मविआ सरकार कोसळत होते त्यावेळीचा एक किस्सा सांगितला. ज्यावेळेस सरकार कोसळत होते, त्यावेळी काही लोकांनी उल्लेख केला की काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे, त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितले आमची भूमिका स्पष्ट आहे. जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणे नाही
तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, तुम्ही तुमचा कार्यकाळ पाच वर्ष पुर्ण केला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केले मी देखील मुख्यमंत्री राहिलो पण असा उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणे नाही असे जाहीरपणे सांगतो, असे म्हणत चव्हाणांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
दरम्यान, महाविकास आघाडी मजबूत ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र सभा घेत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात वज्रमूठ सभा घेत आहेत. पुढील काळात देखील मोठ्या जाहीर सभांचे नियोजन चालू आहे. दरम्यान १ मे रोजी मविआ मुंबईत वज्रमूठ सभा घेणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"