खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 05:53 PM2019-12-21T17:53:01+5:302019-12-21T17:54:34+5:30
पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप भाजपच्या सरकराने केले होते.
मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. तर खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी अशी प्रतिकिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दिली आहे. तर याचवेळी त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे.
नागपुरात सुरु असलेल्या अधिवेशनात विरोधीपक्षाकडून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून गेल्याचार चार दिवसांपासून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर बोलताना बाळसाहेब थोरात म्हणाले की, "महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आधार देण्याचा शब्द महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पूर्ण करत आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा आज झाली आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपून आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहोत”.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आधार देण्याचा शब्द महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पूर्ण करत आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा आज झाली आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपून आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहोत आहोत.#farmloanwaiver
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 21, 2019
तसेच यावेळी त्यांनी भाजपचा सुद्धा समाचार घेतला. ऑनलाइन अर्जाच्या नावाखाली मागील सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला होता. पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप भाजपच्या सरकराने केले होते. मात्र कर्जमाफी शेतकऱ्याचा हक्क असल्याचे आम्ही मानतो, त्यामुळे शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमाफी दिली जाईल. तर खरी मदत खरा फायदा आणि खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी असल्याचा टोला सुद्धा थोरातांनी यावेळी भाजपला लगावला.
ऑनलाइन अर्जाच्या नावाखाली मागील सरकारने शेतकऱ्यांचा जो अपमान केला होता, पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप केले होते, आम्ही मात्र कर्जमाफी हा शेतकऱ्याचा हक्क आहे असे मानतो, त्यामुळे शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमाफी दिली जाईल.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 21, 2019