काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन

By Admin | Published: December 31, 2016 05:12 AM2016-12-31T05:12:38+5:302016-12-31T14:39:07+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री एकनाथ उर्फ बाळासाहेब विखे पाटील यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले.

Congress leader Balasaheb Vikhe Patil merged with Anant | काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन

काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 31 -  कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलिन झाले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि शोकाकुल वातावरणात प्रवरानगर येथे स्व. विखे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून आणि शोकधून वाजवून स्व. विखे यांना मानवंदना दिली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील (वय ८४)यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी प्रवरानगर येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
 
तेथे साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मंत्री प्रकाश मेहता, गिरीश महाजन, संजय राठोड, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. स्नेहलता कोल्हे यांनीही अंत्यदर्शन घेतले. दुपारी बारा वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. दरम्यान काहीवेळ त्यांचे पार्थिव काहीवेळ त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले होते. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दुपारी बाराच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंत्यविधी संस्कार केले. त्यानंतर स्व. विखे यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला.
 
यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून व शोकधून वाजवून स्व. विखे यांना मानवंदना दिली. यावेळी स्व. विखे यांच्या पत्नी सिंधुताई, पुत्र अशोक विखे, डॉ. राजेंद्र विखे, मुली नंदा, बेबी उर्फ शकुंतला, स्नुषा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, नातू डॉ. सुजय विखे यांच्यासह विखे परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रचंड जनसुमदायाने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. हजारो चाहत्यांनी लोकनेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. अनेकांना अश्रुंचा बांध फुटला. लोकनेत्याच्या आठवणींनी वातावरण शोकमग्न झाले.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, आ. शरण रणपिसे, आ. डी. पी. सावंत, संजय दत्त, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, स्थानिका स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश यांनीही यावेळी स्व. विखे यांना श्रद्धांजली वाहिली. विखे हे शेतकऱ्यांचा आवाज होते. परखड व्यक्तिमत्त्वाचा नेता गमावला, अशा शब्दात मोहन प्रकाश यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 



दिशादर्शक व्यक्तिमत्व गमावले
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या निधनाने कृषी, सहकार, ग्रामविकास, शिक्षण, आर्थिक आदी क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने गमावले आहे. थोर सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांचा वारसा समर्थपणे चालवताना त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून परिपूर्ण ग्रामविकासाचे एक आदर्श मॉडेल सादर केले होते. ग्रामीण भागाच्या परिवर्तनाची नस जाणणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये बाळासाहेब अग्रभागी होते. सहकार, कृषी आणि जलिसंचन या क्षेत्रावरील ते साक्षेपी भाष्यकार होते. विविध क्षेत्रातील अफाट लोकसंग्रह हे त्यांचे महत्त्वाचे संचित होते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

बाळासाहेब यांचे योगदान प्रेरणादायी
बाळासाहेब विखे-पाटील यांच्या निधनाने शेती, सहकार, सिंचन क्षेत्रातील एक अभ्यासू नेतृत्व हरपले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा विलक्षण राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. लोकसभेच्या विविध समित्यांवर काम करताना त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था, शिक्षण आणि सिंचनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. महाराष्ट्रातील नद्या जोडून कोकणात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात नेण्याबाबत ते आग्रही होते. दरवर्षी ते केंद्रीय अर्थसंकल्पासाठी अभ्यासपूर्ण सूचना मांडत असत. विविध क्षेत्रातील बाळासाहेब यांचे योगदान सतत प्रेरणा देत राहिल.
-विजय दर्डा, माजी खासदार, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन



ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यासक गमावला
महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या ग्रामीण भागाच्या प्रश्नांचा गाढा अभ्यास असलेले लोकनेते म्हणून बाळासाहेब विखे यांचा उल्लेख करावा लागेल़ कृषी, सहकार, अर्थ आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अतुलनीय योगदान कायम स्मरणात राहिल़ प्रवरानगर-लोणी ते दिल्लीपर्यंतचा केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा आहे़ काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात त्यांनी प्रभावीपणे राबवली. ‘प्रवरानगर’हे ग्रामविकासाचे मॉडेल त्यांनी साकारले. नदीजोड प्रकल्प व महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले. सहकाराचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्यानंतर बाळासाहेब विखे यांनीही ही धुरा समर्थपणे सांभाळली. मंत्री असताना मला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळाले.
- राजेंद्र दर्डा, माजी मंत्री व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ

जनतेशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत बाळासाहेब विखे-पाटील यांनी वंचित आणि तळागाळातील लोकांच्या विकासासाठी कार्य केले. शेतकरी, शेत मजुरांच्या मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली करण्याचे ऐतिहासिक कामही त्यांनी केले.
-खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती

बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात दिलेले योगदान मोलाचे आहे. सहकारातून मिळणारा लाभ सभासदांपुरता मर्यादित न ठेवता त्यातून परिसराचाही विकास व्हायला हवा, यासाठी ते आग्रही होते. अत्यंत अभ्यासू आणि ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेले ते नेते होते. - अरुण साधू, राजकीय विश्लेषक

Web Title: Congress leader Balasaheb Vikhe Patil merged with Anant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.