आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवलाय, भाई जगताप यांचं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:37 PM2022-06-25T14:37:33+5:302022-06-25T14:37:47+5:30
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे असं मत व्यक्त केलं.
दरम्यान, या सर्वांत आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा महत्त्वाची आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. “कोणत्याही कुटुंबाला त्रास होऊ नये हे सर्वांचं कर्तव्य आहे. शिवसैनिक हा रिअॅक्टिव्ह आहे. आतापर्यंत शिवसेनेशी गद्दारी केलेल्या लोकांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे. ही वस्तुस्थिती. काय घडावं तो ज्याच्या त्याचा प्रश्न. पण कुटुंबीयांपर्यंत हे जाता कामा नये. कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल,” असं भाई जगताप म्हणाले.
“महाविकास आघाडी होण्याचं कारण काँग्रेसच होतं. काँग्रेसनं सर्व गोष्टींचा विचार करून, महाराष्ट्राची परवड, मुंबईची पिछेहाट, फडणवीसांनी जे महाराष्ट्राचं वाटोळं केलं, त्याला छेद देण्यासाठी काँग्रेसनं भूमिका मांडली. आम्हाला सत्तेची हाव नाही. जे महाराष्ट्राचं वाटोळं करतायत त्यांना थांबवायला हवं ही भूमिका आजही आहे आणि पुढेही राहिल. आमचे ४४ आमदार ठाम आहेत आणि आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम आहोत,” असंही ते म्हणाले. जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरुन सरकार अस्थिर झाल्याचं दिसत आहे. परंतु असं अनेकदा झालंय. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना असा प्रकार झाला होता. त्यावर मात केली गेल्याचंही असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची इभ्रत घालून सरकार चालवू नका ही सर्वांनाच विनंती असल्याचंही त्यांनी सांगितलं.