देशावर आलेली वेळ मानवनिर्मित; नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान : पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:11 PM2021-06-23T16:11:47+5:302021-06-23T16:13:44+5:30
कोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका. मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका.
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काँग्रेसकडून सातत्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर सरकारवर टीका केली. "आपल्या देशावर जी वेळ आली आहे. ती मानवनिर्मित साथ आहे. पंतप्रधान हे भाजपचे आहेत, ते देशाचे नाहीत. त्यांनी देशाला कोरोनाच्या संकटात लोटले, मोदी यांनी ही परिस्थिती मुद्दाम आणली. हा प्लॅन असून, जागतिक पातळीवर हा प्लॅन झाला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. जळगावमधील फैजपूर येथे बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
"चीनचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी एकत्र आले होते आणि त्यानंतर १९ नोव्हेंबरला पहिला रुग्ण सापडला. हा जागतिक प्लॅन होता. आपल्या देशाच्या नागरिकांचा मृत्यूचा सौदा करणारे मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान आहेत," असं म्हणत पटोले यांनी निशाणा मोदींवर निशाणा साधला.
ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर...
"देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यात येतील असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख न देता लॉकडाऊन लावून देशवासीयांना घरात बसवले. कोरोना काळात उपाययोजना करण्यापेक्षा ताटं वाजविण्यावर मोदींनी भर दिला. ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर रुग्णालयांची गरज भासली नसती," असाही चिमटा त्यांनी काढला. खाद्य तेल असो अथवा इंधन, यांच्या किंमती वाढवून मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटल्याचीही टीका त्यांनी केली.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी
"देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना संदर्भात महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही याची किंमत देशाला हजारो बळी देऊन मोजावी लागली आहे. कालच राहुल गांधी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देत योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे. मागील दोन लाटेत मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले. आतातरी सरकारने जागे व्हावे आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात," असे नाना पटोले म्हणाले.
सात वर्षांत देशात अनागोंदी वाढली
मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात देशात अनागोंदी वाढली आहे. पीक वीमा योजनेतूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे, बरोजगारी वाढली आहे याविरोधात काँग्रेस लढा देत आहे. कोरोना संकटामुळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यास बंधने आहेत मात्र काँग्रेसने कोरोनाचे नियम पाळून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत आणि पुढेही करत राहू. मोदी सरकारच्या काळात फक्त त्यांच्या मूठभर उद्योगपती मित्रांनाच लाभ झाला असून सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहनही केले.