सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र, नाना पटोले यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:18 PM2022-12-07T17:18:03+5:302022-12-07T17:18:37+5:30
महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, पटोले यांचा इशारा
“सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे,” असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला. “सीमा भागात कर्नाटकाकडून होत असलेले हल्ले गंभीर असून आम्ही या भ्याड हल्ल्यांचा निषेध करतो. केंद्रातील मोदी सरकार व काही उद्योपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटक अशा कुरापती काढत आहे. वास्तविक पाहता दोन राज्यात वाद उद्भवल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन तो सामोपचाराने सोडवला पाहिजे पण तसे होताना दिसत नाही,” असे पटोले म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दररोज भडकाऊ विधाने करत आहेत पण महाराष्ट्र सरकारकडून त्याला उत्तर दिले जात नाही. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असे वाटावे अशी परिस्थिती आहे. आपण मोदी-शाह यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीत पण महाराष्ट्राची जनता व काँग्रेस पक्ष कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, वेळ पडली तर आम्ही जशास तसे उत्तर देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.