Nana Patole Narendra Modi : गरिबांना लुटायचे, उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 05:59 PM2021-11-10T17:59:37+5:302021-11-10T17:59:58+5:30

इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी, काळे कृषी कायदे या विरोधात १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान काँग्रेसचा जनजागरण सप्ताह, जेलभरो आंदोलनही करणार.

congress leader nana patole slams pm narendra modi over petrol diesel price lpg protest against them | Nana Patole Narendra Modi : गरिबांना लुटायचे, उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम - नाना पटोले

Nana Patole Narendra Modi : गरिबांना लुटायचे, उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम - नाना पटोले

Next

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाबाजूला दरवाढ, महागाई आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. मोदी सरकारने कृत्रीमरित्या महागाई वाढवून देशातील जनतेची लूट चालवली असून याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान राबविण्यात येणार असून जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.  

"केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास ३५ रूपयांची वाढ सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र त्या दररोज वाढत आहेत. युपीए सरकारवेळी ४४० रुपयांना मिळणारा एलपीजीगॅस आता ९५० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस ९५० रुपयांपर्यंत महाग केला, गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने जवळपास ७५ वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल ११० रुपये, डिझेल ९६ रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी करून जनतेचे आर्थिक शोषण चालवले आहे, असंही पटोले म्हणाले.

कृत्रिम दरवाढीविरोधात आंदोलन
"या कृत्रिम दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत पण जनतेचे रक्त शोषून उद्योगपती मित्रांचे खिसे भरण्यात मग्न असलेल्या मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या हालआपेष्ठा दिसत नाहीत. मोदी सरकारच्या या लोकविरोधी धोरणाबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. केंद्र सरकारने इंधनदरवाढ करून महागाई कशी वाढवली आहे याची माहिती लोकांना देतील. या सर्व कार्यक्रमाची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवरून उपलब्ध करून दिली जाईल आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाईल असे," काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.  

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक मंत्री यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना चाललेला आहे. दोन्ही नेते जबाबदार पदावर आहेत. त्यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्ड, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. यातून महाराष्ट्राची बदनामी सुरु आहे. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. काँग्रेस पक्षासाठी इंधन दरवाढ, वाढती महागाई , बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार आहोत.

संप सामोपचारानं मिटवावा
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सामोपचाराने मिटला पाहिजे. सणासुदीचे दिवस आहेत सर्वसामान्य जनतेला संपाचा त्रास होऊ नये ही सुरुवातीपासून  काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारने एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता, पगार यात वाढ करून त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत. पण भाजप नेते एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजप एसची कर्मचा-यांचा वापर करत आहे असे पटोले म्हणाले.   

Web Title: congress leader nana patole slams pm narendra modi over petrol diesel price lpg protest against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.