Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले, राज्यपालपदाची गरिमा नष्ट केली”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 07:11 PM2023-02-12T19:11:22+5:302023-02-12T19:12:41+5:30
Maharashtra Politics: राज्यपालांवर कोणी टीका करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली.
Maharashtra Politics: भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावर भाष्य करताना भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची गरिमा नष्ट केली. तरीही १५ महिने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ केली. त्याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागणार आहे. राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना परत बोलवावे असे महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न झाले. राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे. आता त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. सरकारच्या कामात हस्तक्षेप करणे अपेक्षित नाही. मात्र, कोश्यारी स्वतः मुख्यमंत्री होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणातून बाहेर जाऊ शकले नाहीत, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.
शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले
महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांचे वागणे अत्यंत वादग्रस्त ठरले. सतत आपण न्यूजमध्ये राहिले पाहिजे. चर्चेत राहिले पाहिजे, असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळे राज्यपाल पदाची गरिमा त्यांनी नष्ट केली, असे म्हणावे लागेल, अशी टीका चव्हाण यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात आल्यावरही वेगवेगळी विसंगत वक्तव्ये करत स्वतःवर आक्षेप ओढवून घेतले. कारण, नसताना बेजबाबदार वक्तव्येही सातत्याने केली. तसे पाहिले तर राज्यपालांवर कोणी टीका टिप्पणी करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले. आमदारांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली. तेही त्यांचा राजीनामा मागण्याचा महत्वाचे आक्षेपाचे कारण होते, असे चव्हाण यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"