“भाजपनंच उडवलेला चिखल साफ धुण्याचं तंत्रज्ञान असलेलं वॉशिंग मशीन त्यांच्याकडेच, हे आज स्पष्ट झालं”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:20 PM2022-08-09T13:20:34+5:302022-08-09T13:22:16+5:30
अडीच वर्षांनंतर राज्यपालांना अशा प्रफुल्ल मनस्थितीत आम्ही पाहत आहोत, मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेत्याचा टीकेचा बाण.
राज्य मंत्रिमंडळाचा गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक दिवसांपासून रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली.
“आज राज्यपालांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. अडीच वर्षांनंतर त्यांना अशा प्रफुल्ल मनस्थितीत आम्ही पाहत आहोत. भाजपनेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपकडेच आहे, हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारातही स्पष्ट झाले. विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते,” असं म्हणत सचिन सावंत यांनी शिंदे भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
७२ तासांत मंत्री होणाऱ्यांना आता मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता तरी कुडमुड्या ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत दादा पाटील विज्ञानवादी दृष्टीने व अब्दुल सत्तार हिंदूत्वाच्या उद्धारासाठी समर्पित होऊन काम करतील ही अपेक्षा व शुभेच्छा, असंही ते म्हणाले.
भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपा कडेच आहे हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात ही स्पष्ट झाले
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 9, 2022
विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते
अजित पवारांकडूनही टीका
उशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं, क्लिनचीट मिळाली नाही. त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं, ते टाळलं असतं तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.