काँग्रेस नेत्यांमुळे आघाडी अडचणीत

By admin | Published: May 4, 2017 05:51 AM2017-05-04T05:51:22+5:302017-05-04T05:51:22+5:30

भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला, तरी त्यांच्या स्थानिक नेत्यांनी जागावाटपात निम्म्यापेक्षा जास्त जागांवर

Congress leaders lead in crisis | काँग्रेस नेत्यांमुळे आघाडी अडचणीत

काँग्रेस नेत्यांमुळे आघाडी अडचणीत

Next

भिवंडी : भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला, तरी त्यांच्या स्थानिक नेत्यांनी जागावाटपात निम्म्यापेक्षा जास्त जागांवर दावा केल्याने समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेस नेत्यांच्या हट्टामुळे आघाडीच्या चर्चेत खोडा घातला गेला असून दोन दिवसांत त्यांनी धोरण न बदललल्यास समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या या हट्टामुळे भाजपाचा फायदा होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
भिवंडी पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस शनिवारी आहे. त्यामुळे भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता करत बेरजेच्या राजकारणात पुढचे पाऊल टाकले आहे. शिवसेना स्वतंत्र लढणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. त्यामुळे तिसरा मोठा पर्याय देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे जाहीर करणत आले होते. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसे जाहीर केल्यानतंरही काँग्रेसने त्याबाबत अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. वरिष्ठ नेत्यांकडून आघाडीचा निर्णय घेतला जाणार असला, तरी स्थानिक नेते त्याला अनुकूल नाहीत. त्यामुळेच काँग्रेस शहराध्यक्षांमुळे आघाडी अडचणीत आल्याची थेट चर्चा सुरू झाली आहे.
चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार असल्याने पक्षीय पातळीवर निवडणूक लढल्यास ते सोपे जाणार आहे. बहुतांश प्रभागात ६० टक्के मुस्लिम तर ४० टक्के हिंदू लोकसंख्या आहे. उरलेल्या प्रभागांत याउलट चित्र आहे. त्यांचा विचार करून उमेदवारी द्यावी लागणार आहे. काँग्रेसने मित्र पक्षांसाठी जागा सोडताना आपल्याला सोईचे नसलेले प्रभाग त्यांच्या वाट्याला देण्याचा प्रस्ताव मांडल्याने हे दोन्ही पक्ष नाराज झाले आहेत. काँग्रेसचे नेते फारसा प्रतिसाद देत नसल्याने समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रत लढतील. त्याची घोषणा गुरूवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

काँग्रेसकडून तिकिटांची खरेदीविक्री : खालीद गुड्डू
ज्या वॉर्डात मी स्वत: निवडून आलो आहे. तसेच जेथे सध्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत किंवा समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यावरही काँग्रेस दावा करते आहे. काँग्रेसचे गेल्यावेळी २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे तीस जागांची मागणी केली, तर ती न्यायाला धरून आहे. मात्र त्यांनी तिकीटाची खरेदी-विक्री सुरू केल्याने ही आघाडी करण्याची त्यांची इच्छा नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी केला. या बाबत आणि आघाडीबाबतची भूमिका समजून घेण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्याशी संपर्क साधला, पण तो होऊ शकला नाही.

काँग्रेस उद्या करणार एबी फॉर्मवाटप
ठाणे : महापालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेसने सावध पाऊल टाकत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आदी (५ मे रोजी) उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचा निर्णय घेतला आहे. लगेचच दुसऱ्या दिवशी उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत जवळपास ७० टक्के उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. या बैठकीत आघाडी केल्यास होणारा फायदा आणि आघाडी न करता लढल्यास होणारा लाभ या दोन्हीवर चर्चा झाली.
भिवंडीत आघाडी न करता स्वतंत्र लढावे अशी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर इतर पक्षातील इच्छुक निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यामुळा काँग्रेसला आघाडीत मोठा वाटा हवा आहे. भिवंडीत उमेदवारी देताना, इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि त्या उमेदवाराची लोकप्रियता या गोष्टीही पक्षाने डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. (प्रतिनिधी)

काँग्रेसने आघाडीत घातला खोडा : नोमानी
ही आघाडी व्हावी, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या, शहराध्यक्षांच्या मनात नाही. काँग्रेसने इच्छा दाखवली नाही, तरी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करतीलच. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला कमजोर करीत भाजपा शहरात वर्चस्व निर्माण करीत असताना सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांना काँग्रेस शहराध्यक्षाने दिलेल्या आश्वासनामुळे आघाडीत खोडा घातला गेला आहे, असे समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष अब्दुस्सलाम नोमानी यांनी सांगितले.

Web Title: Congress leaders lead in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.