स्वार्थांध नेत्यांमुळेच काँग्रेस हरली आहे!
By admin | Published: March 14, 2017 07:34 AM2017-03-14T07:34:42+5:302017-03-14T07:34:42+5:30
काँग्रेस पक्षाला गोव्यात सर्वात मोठा पक्ष बनूनही ती जबाबदारी पेलता आली नाही आणि भारतीय जनता पक्षाने, विशेषत: मनोहर पर्रीकरांनी ती लिलया पेलली.
गोवा विश्लेषण - राजू नायक
काँग्रेस पक्षाला गोव्यात सर्वात मोठा पक्ष बनूनही ती जबाबदारी पेलता आली नाही आणि भारतीय जनता पक्षाने, विशेषत: मनोहर पर्रीकरांनी ती लिलया पेलली.
मतदारांनी २०१७च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न देता त्रिशंकू विधानसभा निर्माण केली होती. परंतु काँग्रेसला लोकशाहीची आणि राजकीय नीतिमूल्यांची तेवढीच चाड असती तर तिने वेगाने हालचाली करून धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णू तत्त्वांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांना एकत्र आणले असते. दुर्दैवाने लुईझिन फालेरोंना स्वत: मुख्यमंत्री होता येत नसेल तर ते पद कोणालाही द्यायची इच्छा नव्हती. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक दोन दिवस काथ्याकूट करीत होती. स्वत: राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग व चेल्लाकुमार राज्यात उपस्थित होते. पक्षाची तिकिटे वाटतानाही दिग्विजय सिंग हताश आणि निष्प्रभ झालेले लोकांनी पाहिले होते, तसे ते आताही झाले.
मी स्वत:ही दिग्विजय सिंग यांना या संदर्भात सतर्क केले होते. तिकीट वाटपात घोळ झाला. गोवा फॉरवर्डशी दगाफटका करण्यात आला व निवडणुकीत हाराकिरी करीत काही काँग्रेस नेते आपलेच नेतृत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते. त्या वेळी मी सिंग यांना सावधानतेचा इशारा देऊन ठेवला होता. त्यांना म्हटले होते, तुम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून जिंकून आला; परंतु वेगवान कृती करण्यात अपयश आल्यास भाजपा बाजी मारून जाणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: गोव्यात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे, असे मी त्यांना बजावले होते. ते गोव्यात येऊन बसलेही; परंतु तिकीट वाटपावेळी झाले, तसे लुईझिनपुढे त्यांची काही मात्रा चालली नाही. संध्याकाळी उशिरापर्यंत मांडवी हॉटेलमध्ये एकानुमते पक्षाचा विधिमंडळ नेता निश्चित होत नव्हता.
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या वेळी काँग्रेसने अत्यंत वेगाने दिगंबर कामत यांना नेता निवडून समविचारी पक्षांना एकत्र आणण्याची आवश्यकता होती- (कारण कामत एकमेव असे नेते आहेत, ज्यांचे विजय सरदेसार्इंबरोबर घरोब्याचे संबंध आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेस नेते आणि पक्षातील नेतृत्वाच्या स्पर्धेतील एकूण एक सदस्यांना त्याची माहिती होती व कामत हेच सर्वांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करू शकतात याची सर्वांना जाणीवही होती)- त्या वेळी विधिमंडळ पक्षाचा नेता गुप्त मतदानाने निवडावा, अशी सूचना पुढे आली.
शनिवारी रात्री दिगंबर कामत हे बाबूश मोन्सेरात यांना घेऊन विजय सरदेसाई यांना भेटले आणि प्राथमिक स्वरूपाची बोलणीही त्यांनी केली होती. फालेरो यांचे नेतृत्व आपण स्वीकारणार नाही, आपण त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवण्यास तयार नाही हे या वेळी सरदेसार्इंनी स्पष्ट केले होते. तरीही फालेरो शेवटपर्यंत नेतृत्वाच्या स्पर्धेत राहिले; कारण आपण मुख्यमंत्री बनू शकत नाही तर कोणीही बनू नये हीच त्यांची भूमिका होती. त्याचा परिमाण म्हणजे फालेरोंची साथ देण्यावाचून सिंग आणि चेल्लाकुमार यांना पर्याय राहिला नाही. त्यामुळे गुप्त मतदान घेण्यात आले; त्यात फालेरोंना सर्वात अधिक सात मते मिळाली (स्वाभाविक आहे, त्यांनीच तिकिटे वाटली होती), दिगंबर कामत यांना पाच तर राणे यांना दोन मते मिळाली. (रवी नाईक आणि सुभाष शिरोडकर यांनी मतपत्रिकेवर स्वत:चेच नाव लिहिले हा आणखी एक विनोद!) म्हणजे स्वत:च्या पलीकडे पाहाणारा एकही नेता यांच्यात नव्हता. रात्री उशिरापर्यंत निकाल राखून ठेवला गेला तेव्हा आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली.
कारण तोपर्यंत पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली होती. त्यानंतर जेनिफर मोन्सेरात या दिग्विजय सिंग यांच्यावर भडकल्या. तुम्ही जनमत कौलाला ठोकरल्याचा आरोप त्यांनी केला. विश्वजीत राणे- जे पहिल्या दिवशी दिगंबर कामत यांना शब्द देऊन आले होते व जे आपल्या वडिलांचे घोडे दामटू लागले होते व त्यानंतर त्यांनी स्वत:चाही मोहरा पुढे करून पाहिला, ते संध्याकाळी गुपचूप मेरियॉटमध्ये मनोहर पर्रीकर यांना भेटून आले हे सर्वांनी पाहिले आहे. आपले वडील मुख्यमंत्री होत असतील तर प्रसाद गावकर हे आपल्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत, असे सांगून त्यांनी गावकर यांना ‘लपवून’ ठेवले होते. नंतर त्यांनीच गावकरना भाजपाच्या कळपात नेऊन सोडले! म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित असलेले बरेच जण काँग्रेस सरकार स्थापन करीत नाही हे समजून आल्यावर आपली ‘स्टेपनी’ पर्रीकरांच्या वाहनाला लागू शकेल काय, याचा अंदाज घेतहोते. गंमत तर पुढेच आहे. फालेरोंना नेतेपदासाठी सात मते मिळाल्यानंतर आठ तास होऊन गेले होते व तोवेळपर्यंत पर्रीकरांना पाठिंबा देणारा जथा राजभवनाकडे गेलाही होता. त्यांनी आपली पत्रे राज्यपालांना सादर केल्यानंतर विधिमंडळ नेता बनणे म्हणजे विरोधी नेता होणे ही गोष्ट फालेरोंच्या लक्षात आली व त्यांचे पाय लटपटू लागले. ते पद घेण्यास इतरही कोणी तयार होईनात. तेव्हा बिचाऱ्या बाबू कवळेकर यांच्या डोक्यावर तो काटेरी मुकूट चढविण्यात आला. लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेस स्वत:हून सत्तेवर आली असती तर फालेरो, रवी, सुभाष, राणे पिता-पुत्र, मोन्सेरात या सर्व नेत्यांच्या भाऊगर्दीत कवळेकरांचा पत्ता सर्वात आधी कटला असता.
आता विरोधी पक्षात बसावे लागल्यावर तोंडाशी आलेला आपला घास हिरावला गेल्याचे दु:ख नेत्यांना झाले आहे. परंतु सत्तेशिवाय गेली पाच वर्षे तडफडावे लागलेल्या काँग्रेसला आणखी एका भयाने पछाडले आहे. ते भय आहे पक्ष तुटून जाण्याचे. या भयात तथ्य आहे; कारण विश्वजीत, मोन्सेरात यांच्यासह अनेक नेते भाजपाच्या कार्यालयासमोर रांग लावून उभे आहेत. त्यामुळे आता विजय सरदेसाई पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करीत असतील तर त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यासाठी हा पक्ष तयार झाला आहे.
यातही काँग्रेस पक्षाचा हताशपणा, दुबळेपणा आणि स्वार्थच दिसतो. जो पक्ष गेल्या सतत दोन निवडणुका सरदेसार्इंशी दगाफटका व विश्वासघात करीत आला आहे आणि ज्या पक्षाचे श्रेष्ठीही त्यात अशिष्ट रस घेत होते ते सरदेसार्इंना मुख्यमंत्री म्हणून कसे स्वीकारू शकतात? काँग्रेस आपल्या ‘विश्वासार्ह’ नेत्यांची काय स्थिती करू शकते त्याचा हा पडताळा नाही तर काय आहे! त्यातही उद्विग्न करणारी व विरोधी पक्षाबद्दलची विश्वासार्हता पार घालविणारी गोष्ट म्हणजे एवढी नामुष्की होऊनही पक्ष अजून आक्रमक होत नाही. लक्षात घ्या, हा पक्ष शेवटपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेलाच नाही. रविवारी सकाळीच त्यांनी राजभवन का गाठले नाही? सेक्युलरिझमची पताका उंच धरावी असेही त्यांना वाटत नाही. निवडणुकीतही या तत्त्वाला त्यांनी हरताळ फासला आणि आताही स्वत:च्या कुकर्माने हे तत्त्व पायदळी तुडविले जातेय याचे त्यांना सोयरसुतक नाही. यात हुशार ठरलाय तो ख्रिस्ती समाज. त्याने अक्कलहुशारीने स्वत:च भाजपाच्या १३ संख्याबळात सर्वाधिक सात सदस्य ख्रिस्ती समाजाचे निवडले! त्यामुळेच काँग्रेस अधिक गलितगात्र बनलीय आणि काँग्रेसला सत्ता स्थापण्याची संधी न मिळाल्याबद्दल काही समविचारी घटक मात्र गळा काढताहेत!