काँग्रेसचा जाहीरनामा : पाणीपट्टीत सूट, युजर चार्जेस करणार माफ
By Admin | Published: February 16, 2017 08:14 PM2017-02-16T20:14:22+5:302017-02-16T20:14:22+5:30
काँग्रेसचा जाहीरनामा : पाणीपट्टीत सूट, युजर चार्जेस करणार माफ
काँग्रेसचा जाहीरनामा : पाणीपट्टीत सूट, युजर चार्जेस करणार माफ
सोलापूर : आॅनलाईन लोकमत
पाणीपुरवठा नियमित व पुरेशा दाबाने होईपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के सूट व युजर चार्जेस पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन काँग्रेसने मनपा निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रचाराचा नारळ सर्वात आधी फोडला व त्यानंतर लागलीच निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात शहरातील नागरिकांना खुश करणाऱ्या सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पार्किंग झोन करून अद्ययावत मार्केट उभारणे, मनपाच्या इमारती व खुल्या जागा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभार करून लोकांचे कल्याण व विकासाच्या कामाला गती दिली जाईल. हद्दवाढ भागात ड्रेनेज सुविधा नसल्याने सेप्टिक टँकची सफाई ही समस्या डोकेदुखीची आहे. मनपातर्फे सेप्टिक टँकची स्वच्छता अल्पदरात करणार आहे. गरीब व्यक्तीचा अंत्यविधी विद्युत दाहिनीत मोफत केला जाईल. मनपा व शासकीय जागेवर क्रीडांगणे वसवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल. आरक्षित जागेवर बागा विकसित करण्यावर भर दिला जाईल.
मनपाच्या दवाखान्यांचे नूतनीकरण करून अद्ययावत सुविधा, हद्दवाढ भागात नवीन दवाखाने उभारले जातील. मनपाच्या दवाखान्यात गरीब महिलांना मोफत कॅन्सर तपासणी उपलब्ध केली जाईल. मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ई-लर्निंग प्रशिक्षण प्रणाली राबविण्यात येईल. बंद पडलेल्या मिलच्या जागेवर केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने घरकूल योजना राबविली जाईल. खोकेधारक व फेरीवाले यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी हॉकर्स झोन करण्यात येतील. झोपडपट्टीधारकांना शासनाच्या परवानगीने दुमजली घर बांधण्यास परवाना मिळवून दिला जाईल. त्याचबरोबर मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी मिळकतींचा सर्व्हे, विकासकामे मार्गी लागण्यासाठी दर तीन महिन्याला नगरसेवकांचा जनता दरबार, युवकांसाठी एमएस-सीआयटी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येतील.
------------------
पर्यटनाला चालना देणार
बंद जकात नाक्यांच्या जागेवर पर्यटन व व्यापारी केंद्र उभारण्यात येईल. पर्यटकांसाठी ओपन बसमधून सोलापूर दर्शनाची सोय उपलब्ध केली जाईल. झोपडपट्टीधारकांना पूर्णपणे करमाफी, युवकांना प्रशासकीय सेवेत संधी मिळावी म्हणून स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांची उभारणी करून अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. शहर स्मार्ट करण्यावर काँग्रेसनेभर दिला आहे.