कॉँग्रेसच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची खरडपट्टी- अपुरी तयारी
By admin | Published: January 28, 2017 09:23 PM2017-01-28T21:23:28+5:302017-01-28T21:23:28+5:30
महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीची बैठक जितेंद्र आव्हाड यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे होऊ शकलेली नाही.
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीची बैठक जितेंद्र आव्हाड यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे होऊ शकलेली नाही. ती आता रविवारी (दि.२९) ठाणे येथे होणार आहे. तथापि, काँग्रेस अंतर्गतच गोंधळाचे वातावरण असून, आधी पूर्वतयारी न करताच कोणत्याही जागांवर दावे ठोकण्याच्या प्रकारावरून श्रेष्ठींनी शुक्रवारी मुंबईत चांगलीच खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने कंबर कसली असून, त्या तुलनेत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था फारशी चांगली आहे. त्यामुळे आघाडीशिवाय पर्याय नाही अशा स्थितीत काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे मागणी करण्यासाठी ज्या प्रभागांविषयी शुक्रवारी मुंबईत चर्चा झाली, त्यात काही ठिकाणी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळे अशा ठिकाणी कशाला जागा मागतात? असा प्रश्न करण्यात आला. विशेष म्हणजे दोन प्रभागांत कॉँग्रेसचा एक किंवा दोन उमेदवार आणि पुन्हा तडजोड करण्यासाठी मनसे तसेच अपक्षांशी युती करण्याचा प्रस्ताव असल्याने त्याविषयीदेखील श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली. कुठे मनसेची आघाडी, तर कुठे अपक्षांबरोबर आघाडी हा काय प्रकार आहे. प्रत्येक प्रभागानिहाय वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी करायची काय? असा प्रश्न करण्यात आल्याचे समजते. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी मेहनत घेत असताना स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी व्यवस्थित झालेली नसल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. कॉँग्रेस पक्षाची ज्याला साथ हवी त्यांनी थेट कॉँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि पक्षचिन्हावर निवडणूक लढवावी, असेही मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. त्यातच निष्ठावानांच्या गटातूनही अगोदरच उमेदवारीसाठी व्यूहरचना सुरू असल्याने त्याचे बैठकीत पडसाद उमटल्याचे समजते. प्रभाग १३ मधील सेवादल कार्यकर्त्या महिलेस उमेदवारी मिळावी म्हणून सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष मदन दायमा यांनी आग्रह धरला. तेथे अगोदरच कॉँग्रेस, मनसे आणि अपक्ष युतीचा प्रस्ताव होता. त्यामुळे श्रेष्ठींनी त्याविषयीही विचारणा करण्यात केल्याचे कळते.