राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:19 PM2024-09-18T15:19:16+5:302024-09-18T15:22:20+5:30
Maharashtra Assembly Election 2024: मविआतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. भाजपात महिलांना मंत्रिपदेही दिली जात नाही, अशी टीका काँग्रेस खासदाराने केली.
Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक दावे-प्रतिदावे केले जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राज्यात अनेक चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लागत आहेत. यातच आता राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नावे आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या महिला खासदाराने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महिला मुख्यमंत्री हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महिला मुख्यमंत्री विषयावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री महिला झाली तर फारच आनंद होईल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का? अशा आशयाच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांनी थेट भाष्य केले. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे सुप्रिया सुळे आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडे रश्मी ठाकरे आहेत. आमच्या पक्षाकडेही महिला नेत्या आहेत. त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना आम्ही संघर्ष करताना पाहिले आहे. भाजपाकडे बघा, भाजपमध्ये महिलांना मंत्रिपदही दिले जात नाही. पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण ५० टक्के आरक्षणही लागू केले असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे.