मुंबई काँग्रेसमधील भांडण शिगेला

By admin | Published: January 24, 2017 04:21 AM2017-01-24T04:21:15+5:302017-01-24T04:21:15+5:30

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश

In the Congress of Mumbai congress, Shigella | मुंबई काँग्रेसमधील भांडण शिगेला

मुंबई काँग्रेसमधील भांडण शिगेला

Next

अतुल कुलकर्णी / मुंबई
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप केल्याने मुंबई काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबई काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद इतरत्र पडू नयेत म्हणून मलमपट्टी करण्यासाठी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग हुडा यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत काही निर्णय झाले, त्यावर सगळ्यांनी सह्या केल्या. मात्र आता त्याच्याविरुद्ध कामत यांचे वागणे आहे, त्यांच्या महत्त्वाकांक्षेपायी आता पक्षच अडचणीत आलेला आहे, असे मत खासगीत पक्षातील ज्येष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.
निरुपम आणि मोहनप्रकाश हे जाणीवपूर्वक लोकांना पक्षाबाहेर काढत आहेत, या दोन्ही नेत्यांच्या वागणुकीमुळे कृष्णा हेगडे या माजी आमदारास पक्ष सोडावा लागला आहे. राहुल गांधी आणि अहमद पटेल उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत व्यस्त आहेत, पण त्यांनी हे तातडीने थांबवावे असे टिष्ट्वट कामत यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हुडा यांची नेमणूक पक्षात चर्चेचा विषय बनली आहे. उद्या (मंगळवारी) होणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डात हाच विषय चर्चेचा असेल असे सांगितले जात आहे.
एकीकडे नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी यापुढे सगळ्या निवडणुका दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन लढायचे असे सांगितले असताना मुंबईत काँग्रेसच्याच गटातटाची भांडणे संपण्याची चिन्हे नाहीत. मुंबईतही आम्हाला आघाडी करायची आहे; पण आमचीच भांडणे संपत नाहीत तेथे तुमच्याशी काय बोलणार? असा उद्विग्न सवाल खा. चव्हाण यांनी त्या बैठकीत उपस्थित केल्याचे एका नेत्याने सांगितले.
गुरुदास कामत हे लोकसभेला १ लाख ८३ हजार मतांनी पराभूत झाले, नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या एकाही विधानसभेत त्यांना यश मिळवता आले नाही. गेल्या दोन वर्षांत शिवसेना किंवा भाजपाविषयी एकही लक्षणीय आंदोलन त्यांनी केले नाही.
असे असताना कामत कशाच्या आधारे पक्षातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मत पक्षाचे काही नेते बोलून दाखवित आहेत.

Web Title: In the Congress of Mumbai congress, Shigella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.