“इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे, शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का”: काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 04:50 PM2023-11-27T16:50:31+5:302023-11-27T16:52:32+5:30
Congress Nana Patole News: या सरकारला अधिवेशनात जाब विचारून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काँग्रेस पाठपुरावा करेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
Congress Nana Patole News: आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजप सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहे. केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत पण जाहीरबाजी व इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का? असा संतप्त प्रश्न विचारत शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारला परवडणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान केले आहे. यावर्षीचे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुष्काळ जाहीर करण्यातही भाजप सरकार राजकारण करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केली.
या सरकारला अधिवेशनात जाब विचारू
संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देऊन सरकारने त्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे. पण शेतकऱ्याला मदत कतानाच सरकार हात आखडता घेत आहे. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी, निर्ढावलेले सरकार आहे, या सरकारला अधिवेशनात जाब विचारून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काँग्रेस पाठपुरावा करेल. शेतकऱ्यांनी मात्र कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन पटोले यांनी केले आहे.
दरम्यान, सरकार जाणीवपूर्वक मराठा-ओबीसी वादाला खतपाणी घालत आहे, हा वाद पुढच्या पिढ्यांसाठीही घातक ठरणारा आहे. भाजप सरकारने आरक्षणप्रश्नी स्पष्ट व ठोस भूमिका घ्यावी तसेच जातनिहाय जनगणना घेतली पाहिजे. बिहार, छत्तीसगड सरकार जातनिहाय जनगणना करते तर महाराष्ट्र सरकार का करत नाही? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.