“आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में”; काँग्रेसची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:28 PM2023-10-31T13:28:25+5:302023-10-31T13:29:38+5:30
Congress Nana Patole: देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथे विधानसभा निवडणूक प्रचाराला गेल्याबाबत विरोधक टीका करत असून, राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे.
Congress Nana Patole: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जाळपोळीच्या घटनांनंतर अनेक नेत्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा भडका उडालेला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथे प्रचारात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. यावरून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनीही निशाणा साधत, महाराष्ट्र जळत असताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसे शकता, असा सवाल करत टीका केली आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये, आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में
नाना पटोले ट्विटमध्ये म्हणतात की, आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे.आमदारांची घरे पेटवून देण्यात आली असून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याचे प्रकार घडले आहेत बससेवा विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका आरोग्य, शिक्षण आणि इतर सेवांना बसतोय. अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहेत. तर ते छत्तीसगडमध्ये भाजपाचा प्रचार करण्यात बिझी आहेत. ' भाजपाच्या नेत्यांना २४ तास केवळ राजकारण करायची हौस असते. जनतेच्या सुखादुःखाशी त्यांना काही देणेघेणे नाही. या अशा असंवेदनशील गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा काडीचाही अधिकार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, छत्तीसगड येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. प्रचाराला वेग येत आहे. भाजपचे अनेक नेते, मंत्री छत्तीसगडमध्ये जात आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीसगडमधील रायपूर शहर येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला, चर्चा केली. तसेच एका रॅलीतही सहभाग नोंदवला. देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथे प्रचाराला गेल्याबाबत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे.