Maharashtra Politics: “...तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, पक्ष कमजोर होता का?”; पटोलेंचा राऊतांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 03:35 PM2023-02-10T15:35:07+5:302023-02-10T15:35:46+5:30
Maharashtra News: संजय राऊतांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, असा सल्ला नाना पटोलेंनी दिला.
Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून टीका करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या गोष्टीचे समर्थन केले. यानंतर आता नाना पटोले यांनी यावरून संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
मी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते असे म्हणता तर तुमचे नेतृत्व कमी पडत होते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशी विचारणा करत, मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊतांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर खोक्याचे सरकार आले नसते. मी राहिलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार राहिले असते. अशा पद्धतीचे वक्तव्य करून ते माझ्या शक्तीचा परिचय करून देत आहे. त्यांनी माझ्या शक्तीचा देशाला परिचय करून दिला आहे. पण ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचे नेतृत्व कमी पडत होते का? असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? हा प्रश्न निर्माण होतो, असा टोला नाना पटोलेंनी लगावला.
पक्षाचा आदेश पाळणे हे कार्यकर्ता म्हणून माझे काम होते
मला संवैधानिक अधिकार होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केले नाही केले, त्यावर ते बोलत नाहीत. राऊत यांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. राऊतांनी या प्रश्नात लक्ष घालावे. भाजपने खोक्याने सरकार पाडले, अशी टीका करत, मला विधानसभा अध्यक्ष पद देण्याचा निर्णय हा सोनिया गांधी यांचा होता. मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही सोनिया गांधी यांचाच होता. पक्षाचा आदेश पाळणे हे कार्यकर्ता म्हणून माझं काम होते. हायकमांडच्या निर्णयावर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर ते योग्य नाही. मी फक्त राऊतांना सल्ला देऊ शकतो. मी काही विद्वान नाही, असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"