“हे भाजपचे षड्यंत्र, काही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 04:22 PM2022-06-23T16:22:45+5:302022-06-23T16:23:24+5:30
महाविकास आघाडी आहे, तोपर्यंत सोबत आहोत. अन्यथा आम्ही विरोधात बसायला तयार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाविकास आघाडी सरकार अल्पमतात नाही. फ्लोअर टेस्टशिवाय त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकत नाही. ईडीची भीती दाखवून भाजपवाले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेची परिस्थिती हे भाजपचे षड्यंत्र आहे. मात्र, काही झाले तरी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटून आलो आणि राज्यात सत्तांतर झाल्यास आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत, असे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. यातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेट अँड वॉचची भूमिका घेतना दिसत आहेत.
या राजकीय घडामोडींनंतरही भाजपवाले बिळातून बाहेर यायला तयार नाहीत, याचाच अर्थ महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असे दावा नाना पटोले यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत. तसेच नितिन देशमुख यांनी परत येऊन सांगितलेली गोष्ट तेथील चित्र स्पष्ट करणारी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या अंतर्गत मुद्द्यात काँग्रेसला पडायचे नाही
नितिन देशमुख आणि कैलास पाटील तेथून निसटून आले आहेत. मात्र, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. काँग्रेसला त्यात पडायचे नाही. मात्र, भाजपची जी कुटनीति सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होत आहे. त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली. राज्यातील परिस्थितीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या सर्व खेळीत भाजप आहे, हाच याचा अर्थ होतो. गुजरात आणि आसाममध्ये कुणाचे सरकार आहे. त्यांना मदत कोण करत आहे. यावरून भाजप यामागे असल्याचे स्पष्ट होते. मात्र, भाजप नेते जी काही प्रतिक्रिया देत आहेत, त्यावरून त्यांचा खोटारडेपणा सिद्ध होतो, या शब्दांत नाना पटोले यांनी भाजपचा समाचार घेतला.
दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला २४ तासांचे अल्टिमेटम दिला असून, मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाविकास आघाडीतून प्रथम बाहेर पडा, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे.