Maharashtra Politics: “सावरकर हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:50 AM2023-03-28T09:50:03+5:302023-03-28T09:50:59+5:30
Maharashtra News: सावरकर मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत. त्यात यश येणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: सावरकरांच्या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठ्या लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. सावरकर हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांची भूमिका सावरकर यांच्याबाबत भिन्न आहे. ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. काँग्रेस सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची जाती, धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सावरकरांच्या मुद्दय़ांवर आमचे नेते राहुल गांधी व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे चर्चा करतील, असे नाना पटोले यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र
देश, लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई महत्वाची आहे. ही लढाई मोठी असून भाजपविरोधातील लढाईसाठी आम्ही एकत्र लढत आहोत. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही. परंतु सावरकर मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच आहोत. देशातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा व मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणूनच ते सावरकरांसारखे मुद्दे पुढे करून जबाबदारीपासून पळ काढत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सुरात सुर मिसळला आहे. भाजपने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान केला हे जनता अजून विसरलेली नाही. एकनाथ शिंदे फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"